![]()
सिन्नर-ठाणगाव मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक जुन्या वृक्षांची मुळे उघडी पडली असून ही झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघाताची भीती व्यक्त होत आहे. विकासकामांदरम्यान अनेक वृक्षांच्या बुंध्याभोवतीची माती काढून टाकण्यात आल्याने त्यांची मुळे पूर्णपणे उघडी पडली आहेत. काही ठिकाणी वृक्ष केवळ मुळांच्या आधारावर उभे असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने झाडे कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते, विकासकामे आवश्यक असली तरी त्यासाठी वर्षानुवर्षे पर्यावरण संवर्धन करणाऱ्या वृक्षांचे नुकसान होऊ नये. संबंधित विभागाने उघड्या पडलेल्या मुळांभोवती तातडीने माती भरून वृक्षांना आधार द्यावा तसेच या कामाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
रुंदीकरणाच्या कामाने सिन्नर-ठाणगाव मार्गावर अपघाताची भीती:वृक्ष धोक्यात, तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी
