![]()
जे केवळ ‘ब्रँड-ब्रँड’ अशी भाषा करत आहेत, त्यांचा महापालिका निवडणुकीत जनता बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर नाव न घेता बोचरी टीका केली.
.
महायुतीत जागा वाटपावरून अनेक चर्चा सुरू आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या जागा वाटपाच्या शंकांचे निरसन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महायुतीचा फॉर्म्युला ठरला असून चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाहेर काय चर्चा सुरू आहेत, याकडे लक्ष न देता कामाला लागा असे आवाहन शिवसैनिकांना केले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशाचा पाढा वाचताना शिंदे म्हणाले की, राज्यात सर्वत्र महायुतीचा भगवा फडकला आहे. नगरपरिषदांमध्येही जनतेने आम्हालाच कौल दिला असून, आगामी महापालिका निवडणुकीतही महायुतीचाच भगवा फडकणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असून ‘बोलण्यापेक्षा काम करण्यावर आमचा भर असतो,’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाची मुक्तकंठाने स्तुती केली. या सभेमुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने आतापासूनच कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे.
महायुतीत मिठाचा खडा टाकू नका
कल्याण डोंबिवलीत भाजपचाच महापौर होईल. भाजपाने स्वबळावर लढावे अशी वक्तव्य गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे पदाधिकारी करीत आहेत. महायुतीविरोधात वक्तव्ये करणाऱ्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी खडे बोल सुनावले. शिंदे म्हणाले की, डोंबिवली हा सुरुवातीपासूनच महायुतीचा, हिंदुत्वाचा बालेकिल्ला राहिला असून कोणीही त्या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विकासकामांची जंत्री वाचून दाखवण्यासह विरोधकांचा समाचार घेतला.
