![]()
पुण्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ घडल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमुळे पक्षांतर्गत अस
.
प्रशांत जगताप यांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठी माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत जगताप हे आज काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून, दुपारी 12 वाजता पुण्यातील टिळक भवन येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीच्या धोरणावरून नाराजी व्यक्त करणाऱ्या जगतापांनी अखेर काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील काँग्रेसला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काँग्रेसव्यतिरिक्त शिवसेना ठाकरे गटाकडूनही प्रशांत जगताप यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रशांत जगताप यांना फोन केल्याचे समजते. गुरुवारी रात्री उशिरा सुमारे नऊ मिनिटे दोघांमध्ये थेट संवाद झाला. या फोन कॉलमध्ये उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना पक्षात येण्याचे आमंत्रण देत योग्य सन्मान दिला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट कधीही भाजपसोबत जाणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. याशिवाय, गेल्या दोन दिवसांत ठाकरे गटातील अनेक नेत्यांनीही जगताप यांच्याशी संपर्क साधून पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली होती.
या सर्व घडामोडींवर प्रशांत जगताप यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांनी आपल्यासारख्या एका कार्यकर्त्याशी थेट संवाद साधला, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि संघर्ष करण्याची तयारी असलेल्या नेत्याने आपली भावना समजून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही आमच्या पक्षात काम करू शकता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचा उल्लेख करत जगताप यांनी आभार मानले. मात्र, आपण भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. आपण काँग्रेस विचारसरणीचा कार्यकर्ता असल्याने ठाकरे गटात जाणे शक्य नसल्याचेही त्यांनी याआधी स्पष्ट केले होते.
लढाई कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून, विचारधारात्मक
आपल्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना प्रशांत जगताप यांनी आपली लढाई संविधान आणि पुरोगामी विचारधारेसाठी असल्याचे स्पष्ट केले. ही लढाई कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून, विचारधारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील भाजप सरकारला आणि महायुतीला सक्षमपणे आव्हान देऊ शकणारा पक्ष निवडणे, हाच आपल्या निर्णयामागचा निकष असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काही तासांत आपण आपल्या राजकीय आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, आणि त्यानुसार काँग्रेस प्रवेशाची घोषणा समोर आली आहे. या साऱ्या घडामोडींमुळे पुण्यातील राजकारण तापले असून, आगामी महापालिका निवडणुकीआधीच पक्षांतराच्या राजकारणाने वेग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
