मराठवाड्याला मोठा दिलासा:7 वर्षांत नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचा फडणवीसांचा निर्धार, शेतकऱ्यांची 48 हजार कोटींची वीजबिले रद्द

[ads1]


मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण आणि शहीद स्मारकास मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकण आणि कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी आणण्याची महत्त्वाची घोषणा केली. सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे मराठवाडा मुक्त झाला, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असले तरी, शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे. ५ ऑक्टोबरनंतर पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल. सरकारने शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले रद्द केली आहेत आणि मोफत वीज दिली जात आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू न देण्याच्या संकल्पांतर्गत भीमा खोऱ्यातून ३० टीएमसी, तर उल्हास खोऱ्यातून (कोकण) गोदावरी खोऱ्यात ७० टीएमसी पाणी आणले जाईल. हा नदीजोड प्रकल्प येत्या सात वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल. सोबतच, शहराची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्येक घरात दररोज पिण्याचे पाणी येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. औद्योगिक विकासाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्ग आणि पश्चिम उन्नत द्रुतगती मार्गामुळे शेंद्रा-बिडकीनसारखे क्लस्टर आता देशातील प्रमुख केंद्र बनले आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यू आणि एथर यांसारख्या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगर देशातील सर्वात मोठे ‘इलेक्ट्रिक व्हेईकल्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ बनेल. उद्योग विस्तारासाठी आणखी ८,००० एकर जमीन घेतली जात आहे. याशिवाय, जालना ड्रायपोर्टचे काम सुरू झाले आहे. शेंद्रा-बिडकीन आणि बिडकीन-ढोरेगाव रस्ते ३,५०० कोटी रुपये खर्च करून सहापदरी केले जात आहेत. शहरात सर्वात लांब उन्नत रस्ता (फ्लायओव्हर) तयार होत असल्याने भविष्यातील वाहतूक कोंडी टळेल. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही वेगाने काम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी ७१० कोटी रुपये, धाराशिवमध्ये ५०० खाटांचे आधुनिक रुग्णालय आणि परळीत ५६५ कोटी रुपये खर्च करून पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह विविध खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *