![]()
राज्यातील नगर परिषद निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या पराभवानंतर भाजपमध्ये उडालेला अंतर्गत संघर्षाचा धुरळा आता खाली बसताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी असलेला संघर्ष मिटवण्यासाठी भाजप प्र
.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपला चंद्रपुरात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निकालामुळे व्यथित झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, मुनगंटीवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राजकीय गणिते आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता यावर दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली.
जोरगेवारांची ‘निवडणूक प्रमुख’ पदी वर्णी
चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या नियोजनावरून पक्षात दोन गट पडल्याचे चित्र होते. सुरुवातीला आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र मुनगंटीवार समर्थकांच्या नाराजीनंतर तातडीने निर्णय बदलून अजय संचेती यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली. यामुळे जोरगेवार गट दुखावला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर, कोणालाही नाराज न करता पक्षाने पुन्हा एकदा फेरबदल करत जोरगेवार यांची ‘निवडणूक प्रमुख’ पदी वर्णी लावली आहे.
चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक आता आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल. यामुळे जिल्हयातील मुनगंटीवारांचे वर्चस्व मान्य करण्यात आले आहे. दुसरीकडे, किशोर जोरगेवार यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद कायम ठेवतानाच, प्रक्रियेत पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी चैनसुख संचेती यांची ‘निवडणूक निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गटबाजी रोखण्याचे आव्हान
नगर परिषद निवडणुकीतील पराभवाचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने हा सावध पवित्रा घेतला आहे. जोरगेवार आणि मुनगंटीवार या दोन्ही नेत्यांच्या ताकदीचा वापर करून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमधील गटबाजी संपवण्यासाठी ‘बाहेरचा’ निरीक्षक (चैनसुख संचेती) नेमणे हा पक्षाचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. आता या नव्या त्रिमुर्तीच्या नेतृत्वात भाजप चंद्रपूर महापालिकेत कमळ फुलवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
