नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नसतानाही काही नागरिकांकडून घाबरून (पॅनिक) पेट्रोल-डिझेलची जादा खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी वाढत असून काही ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा विभाग), नांदेड यांनी इंधन वितरणाबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी घाबरून इंधन साठवणूक करू नये. दुचाकी वाहनांसाठी विदाउट गिअर वाहनांना २०० रुपयांपर्यंत तर विद गिअर वाहनांना ३०० रुपयांपर्यंत इंधन देण्यात येणार आहे. तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपयांपर्यंत आणि चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त १५०० रुपयांपर्यंत इंधन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोठ्या वाहनांसाठी ५० लिटर आणि अवजड वाहनांसाठी १०० लिटरपर्यंत इंधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच, कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिक बाटल्या, ड्रम किंवा कॅनमध्ये इंधन देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पेट्रोलपंपांवर गर्दी वाढल्यास पोलिस प्रशासनाच्या मदतीने टोकन पद्धतीचा अवलंब करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.कायद्याचे उल्लंघन करून इंधनाचा काळाबाजार केल्यास संबंधितांवर पेट्रोलियम अॅक्ट १९३४ व अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
याशिवाय, अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र इमर्जन्सी लेन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यामध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने, तसेच शासकीय व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व पेट्रोलपंप चालकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करून पॅनिक खरेदी टाळावी, असे आवाहन केले आहे.
Post Views: 148
