फक्त एकदा “राम राम” बोलल्याने बदली थांबली…!  – VastavNEWSLive.com


काही वर्षांपूर्वीची ही सत्य घटना आजही मनाला माणुसकीची जाणीव करून देते.

माझे एक जिवलग मित्र आणि नोकरीतील जुने सहकारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात कार्यरत होते. पदोन्नती मिळाल्याचा आनंद होता, पण त्याचबरोबर बाहेरगावी बदलीचे आदेशही आले. सुरुवातीपासून नांदेडमध्येच सेवा केल्यामुळे वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि परिस्थिती पाहता बाहेरगावी जाणे त्यांना शक्य नव्हते. परंतु बाहेरगावी रुजू न झाल्यास पदोन्नतीही गमवावी लागणार होती.

ते अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत माझ्याकडे आले. त्यांच्या डोळ्यांत काळजी होती आणि मनात असंख्य प्रश्न होते.
मी त्यांना धीर देत एवढेच म्हणालो, “घाबरू नका. तुमची पदोन्नतीही कायम राहील आणि बदलीही थांबेल. पण माझं एक ऐका.”
मी त्यांना विभाग नियंत्रक कार्यालयात जाण्यास सांगितले. एका अधिकाऱ्यांच्या कॅबिनसमोरून जाताना फक्त नम्रपणे “राम राम साहेब” एवढेच म्हणायचे. जर त्यांनी आत बोलावले तर फक्त एकच वाक्य बोलायचे…

“मी शाहूंचा मित्र आहे.”
यापेक्षा एक शब्दही जास्त बोलायचा नाही.
माझ्या मित्राने अगदी तसेच केले आणि परत माझ्याकडे आला.
त्या काळात मोबाईल फोन नव्हते. माझे त्या अधिकाऱ्यांशी जुने जिव्हाळ्याचे संबंध असल्याने मी त्यांना कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क केला.
फोन उचलताच त्यांनी हसत विचारपूस केली आणि स्वतःच म्हणाले,
“काल एक गृहस्थ आले होते. ते म्हणत होते की ते तुमचे मित्र आहेत.”
मी हसून उत्तर दिले,
“हो साहेब, ते माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत.”
क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी विचारले,
“सांगा, त्यांच्यासाठी काय करायचं?”
मी नम्रपणे विनंती केली,
“त्यांची पदोन्नती कायम ठेवून बदली रद्द झाली तर मोठे उपकार होतील.”
ते म्हणाले,
“झालं समजा.”
आणि एक दोन दिवसांतच त्यांची बदली रद्द झाली. पदोन्नतीही कायम राहिली.
ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश एवढाच…

जीवनात प्रत्येक गोष्ट फक्त नियम, कागदपत्रे किंवा अधिकारानेच होत नाही. अनेक वेळा आपुलकी, विश्वास, जुने जिव्हाळ्याचे संबंध, नम्रता, आदर आणि प्रेमाने बोललेले दोन शब्द अशक्य वाटणारी कामेसुद्धा सहज घडवून आणतात.
“राम राम” हा केवळ शब्द नाही, तर तो आदर, संस्कार आणि माणुसकीचा सेतू आहे.
पद, पैसा, अधिकार आणि संपत्ती यापेक्षा माणसाने आयुष्यात कमावलेली माणसं अधिक मौल्यवान असतात. कारण संकटाच्या वेळी पैसा नव्हे, तर माणुसकीची श्रीमंतीच आपल्या मदतीला धावून येते.
म्हणूनच…
नाती जपा… माणसं जोडा… नम्रता कधीही सोडू नका…
कारण शेवटी प्रत्येक माणसाला सन्मान, आपुलकी आणि प्रेमाचीच भूक असते. ही भूक ज्याने ओळखली, त्याने आयुष्यातील अनेक कठीण दरवाजे सहज उघडताना पाहिले.

-राजेंद्र सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
7700063999



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *