[ads1]
![]()
माहेरून आणखी हुंडा घेऊन येण्यासाठी होत असलेल्या कथित छळाला कंटाळून 28 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. नित्या राय असे मृत विवाहितेचे नाव आहे. नित्याला अवघ्या 9 महिन्यांची मुलगी असून, आईच्या मृत्यूमुळे ही चिमुकली आईच्या मायेपासून कायमची दुरावली आहे. या प्रकरणी नित्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासू आणि आजी सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लग्नानंतर छळ सुरू झाल्याचा आरोप नित्या राय हिचे डिसेंबर 2021 मध्ये उल्हासनगर येथील गौरव संजय राय याच्यासोबत लग्न झाले होते. गौरव हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून नित्या यांनी एमएससी आणि बीएडपर्यंत शिक्षण घेतले होते. लग्नावेळी नित्याच्या कुटुंबीयांनी रोख रक्कम, संसारोपयोगी वस्तू तसेच लग्नाचा खर्च केला होता. सुमारे पावणेचार लाख रुपये रोख हुंडा दिल्याचा दावा तिच्या वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. मात्र, लग्नानंतर काही काळातच नित्याला सासरी त्रास दिला जाऊ लागल्याचा आरोप आहे. घरातील काम व्यवस्थित करत नाही, अशा कारणांवरून तिच्याशी वाद घातले जात होते. त्यानंतर माहेरून आणखी पैसे आणि हुंडा घेऊन येण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे नित्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. मुलगी झाल्यानंतरही त्रास दिल्याचा आरोप नित्याला मुलगी झाल्यानंतरही तिचा त्रास थांबला नाही, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मुलगी झाल्यामुळे सासू माधुरी संजय राय आणि आजी सासू शारदा राय यांनीही नित्याला त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सततचा कौटुंबिक त्रास आणि हुंड्यासाठी होत असलेल्या मागणीमुळे नित्या मानसिकदृष्ट्या त्रस्त होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर तिने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पतीसह तिघांविरोधात गुन्हा या घटनेनंतर नित्याच्या वडिलांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती गौरव संजय राय, सासू माधुरी संजय राय आणि आजी सासू शारदा राय यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नित्याचा पती गौरव राय याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. 9 महिन्यांच्या मुलीचा आधार हरपला नित्याच्या मृत्यूमुळे तिच्या 9 महिन्यांच्या मुलीवर आईचे प्रेम आणि मायेचे छत्र हरपले आहे. एका चिमुकलीने आई गमावल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नित्याच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. हेही वाचा… ‘पुरावे नसताना कुणालाही आरोपी म्हणता येणार नाही’:दिशा सालियन प्रकरणावर माजी अतिरिक्त महासंचालक पी. के. जैन यांचे स्पष्ट मत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एफआयआरमध्ये काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याने राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ एफआयआरमध्ये नाव असल्याने संबंधित व्यक्तीला आरोपी ठरवता येणार नाही. तपासात ठोस पुरावे समोर येणे आवश्यक आहे, असे राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. के. जैन यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर लिहा..
[ads2]
हुंड्याच्या तगाद्याला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल:9 महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले, उल्हासनगरातील घटना
















Leave a Reply