हिंगोलीतील फुलदाभा परिसर मध्यरात्रीला झालेल्या भूकंपाने हादरला:3.6 रिश्‍टर स्केलची नोंद, परिसरातील गावकऱ्यांनी रात्र काढली जागून




औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसर बुधवारी ता. 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. या भागात वारंवार होणाऱ्या भूकंपाची कारणे शोधण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे तसेच कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा परिसरातील केंद्रबिंदू असलेल्या भागात मागील काही दिवसांत वारंवार भूकंप होत आहेत. कधी भूगर्भातून गडगडाट तर कधी भूकंप यामुुळे या भागातील नागरीक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. दरम्यान, बुधवारी ता. 1 मध्यरात्री 1 वाजून 20 मिनीटांनी भूगर्भातून मोठा आवाज झाला. त्यानंतर घरांची तावदाने तसेच टीपनत्रे हालू लागली होती. त्यामुळे भूकंप होत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला. या भूकंपाची 3.6 रिश्‍टर स्केल नोंद झाली असून खोली 5 किलो मिटर नोंदविण्यात आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा व जलालदाभा परिसरात या भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भूकंपाचे धक्के वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, कुरुंदा, गिरगाव, औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा, जलालदाभा, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, निशाणा, असोंदा, काकडदाभा, पांगरा, मेथा, जडगाव, राजापूर, जांब या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे परिसरातील गावकऱ्यांनी भितीच्या छायेखाली रात्र जागून काढली आहे. दरम्यान, या भागात वारंवार भूकंपाचे धक्के का बसू लागले आहेत याची नेमकी कारणे शोधली जात नसल्याने गावकऱ्यांमधून भितीचे वातावरण कायम आहे. भूकंप झाल्यांनतर प्रशासनाकडून भेटीचे सोपस्कार पूर्ण केले जात असून गावकऱ्यांमधून जनजागृती करून काय करावे अन काय करू नये असे सांगितले जाते. मात्र नेमके कारण काय आहे याचा शोध का घेतला जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. या भूकंपामुळे कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी मागील काही दिवसांपासून भूकंपाची तिव्रता वाढत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *