![]()
पर्यावरण संतुलन राखणे आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज ओळखून शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या निसर्ग संवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश दिला. पंधरवड्यानंतर पावसाने हजेरी लावल्याचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. यावेळी संस्थापक वनश्री डॉ. जे. डी. पवार आणि प्राचार्य बी. एन. शिंदे यांच्या हस्ते वनौषधी रोपट्यांची लागवड करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. शाळेच्या परिसरात विविध औषधी तसेच सावली देणाऱ्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. तसेच प्लॅस्टिकमुक्त परिसर निर्मिती आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले. शपथविधीनंतर विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी हेच जीवन’ आणि ‘पर्यावरणाचे रक्षण, स्वतःचे संरक्षण’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पालक आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. यावेळी उपप्राचार्य अविनाश लांडगे, मुख्याध्यापक जे. एल. पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले प्रमुख संकल्प १) प्लॅस्टिकचा वापर टाळणार : दैनंदिन जीवनात एकदाच वापरल्या जाणाऱ्या (सिंगल-युज) प्लॅस्टिकचा वापर न करण्याचा निर्धार. २) पाण्याची बचत करणार : घरात व शाळेत पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प. ३) वृक्षलागवड व संगोपन : केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे पुढील काही वर्षे जबाबदारीने संगोपन करण्याची प्रतिज्ञा. यावर्षीही शाळा परिसरात ५०० झाडे लावणार ^निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. आता त्याची परतफेड करण्याची जबाबदारी आपली आहे. आमचे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान घेणारे नसून जबाबदार नागरिक म्हणून घडत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. दरवर्षीप्रमाणे याही पावसाळ्यात शाळा परिसरात ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. – शैलेश पवार, अध्यक्ष, गुरुदत्त शिक्षण संस्था
‘झाडे लावा, झाडे जगवा’चा निर्धार; विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक शपथ:मानूर येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निसर्ग संवर्धनाचा संकल्प
