![]()
देशभर आणि विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये पाय पसरू पाहणाऱ्या बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. या टोळीचा म्होरक्या अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकर या दोन प्रमुख आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परदेशातून फोन करून भारतीय व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या या टोळीचे संपूर्ण नेटवर्क समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. पिंपरी-चिंचवड येथील एका फर्निचर दुकानावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा मुद्दा विधिमंडळ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सदस्य अस्लम शेख यांनीही या संदर्भात उपप्रश्न विचारला होता. परदेशातील हस्तकांचा माग काढणे सुरू मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, या गुन्ह्यातील इतर दोन मुख्य आरोपी रिजू बिश्नोई आणि शुभम लोणकर सध्या फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. हे आरोपी सध्या भारताशी प्रत्यर्पण करार नसलेल्या देशांमध्ये आश्रय घेऊन असल्याचे तपासात समोर आले आहे. तिथूनच वेगवेगळ्या देशांतील आभासी किंवा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकांचा वापर करून ते व्यापाऱ्यांना धमकावत आहेत. या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा माग काढण्याचे काम सुरू असून, लवकरच पोलिस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई-पुण्यात पोलिसांची व्यापक मोहीम यापूर्वी बिश्नोई टोळीसाठी काम करणाऱ्या काही भाडोत्री शूटर्सनाही (कॉन्ट्रॅक्ट किलर्स) अटक करण्यात आली आहे. या टोळीचा उपद्रव देशभरात असला, तरी मुंबई आणि पुणे यांसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ते अधिक सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दोन्ही महानगरांमध्ये पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पिंपरी गोळीबार प्रकरणी ४ जण अटकेत, ‘मकोका’ लागू या प्रकरणातील पोलिस कारवाईची सविस्तर माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली. त्यांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत फर्निचर दुकानावरील गोळीबार आणि व्यापाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित ८ आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींकडून २ पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले खंडणीचे फोन आलेल्या संबंधित व्यापाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली असून, पोलिस आयुक्तालय क्षेत्रात रात्रीची व दिवसाची गस्त वाढवण्यात आली आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस कर्मचारी (Undercover Officers) तैनात करण्यात आले आहेत. तसेच, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांमार्फत संयुक्त बैठकांचे आयोजन केले जात असल्याची माहितीही गृह राज्यमंत्र्यांनी दिली.
बिश्नोई टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार:अनमोल बिश्नोई-प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती
