गणेशोत्सवात ढोल ताशांसोबत पारंपरिक वाद्ये, खेळांचे सादरीकरण करा:ढोल ताशा फेडरेशनच्या बैठकीत राज्यव्यापी महासंघाचे पथकांना आवाहन

[ads1]


महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यात राज्यातील ढोल ताशा पथकांचा मोठा सहभाग असतो. यंदा आगमन मिरवणुकांमध्ये ढोल ताशांसोबत पारंपरिक वाद्ये, ताल आणि खेळांचे सादरीकरण करावे, असे आवाहन ढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ महाराष्ट्रच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सचिव संजय सातपुते, खजिनदार ॲड. शिरीष थिटे, सदस्य विलास शिगवण आणि आशुतोष देशपांडे (पुणे) उपस्थित होते. तसेच अनिरुद्ध देशपांडे (नागपूर), अतुल दौंडकर (पिंपरी चिंचवड), सुभाष लाडे (मुंबई) आणि सिद्धू जित्ता (सोलापूर) हे पदाधिकारीही हजर होते. पुणे शहर अध्यक्ष अक्षय बलकवडे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष विशाल मानकर आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत कुडक्याल यांचीही उपस्थिती होती. अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले की, गणेशोत्सवातील आगमन मिरवणुका आणि सोसायट्यांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वाद्ये आणि खेळांच्या प्रात्यक्षिकांचा समावेश करावा. ढोल वाद्यांचे पारंपरिक पाच हातांचे सादरीकरण व्हावे. अनेक पथकांमध्ये लेझिम, ध्वज, ढाल तलवार, टिपरी आणि साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व पथकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, गुणवान वादकांचा गौरव आणि आरोग्य शिबिर यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असेही आवाहन करण्यात आले. सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील पथकांशी संपर्क साधून त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल. ढोल ताशा पथकांच्या अडचणी सोडवणे, या ऐतिहासिक कलेचा प्रचार-प्रसार करणे आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी महासंघाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शाळांमधून ढोल ताशा, लेझिम, टिपरी, ढाल तलवार आणि ध्वज या कला प्रकारांना प्राधान्य मिळावे, यासाठी आग्रही भूमिका घेण्याचा निर्णयही बैठकीत झाला. तसेच राज्य सरकारच्या कार्यक्रमांमध्ये ढोल ताशा वादनाला प्राधान्य मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *