कुटुंबीयांसह पर्यटनासाठी जाणे पडले महागात:निवृत्त आरोग्य पर्यवेक्षकाच्या घरातून 16 तोळे सोने लंपास, संभाजीनगरातील घटना




महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीचा अचूक डाव साधत चोरट्यांनी बंद घरावर मोठा डल्ला मारला. मिटमिटा येथील देवगिरी व्हॅलीतील (रा. जी-४३) सेवानिवृत्त तालुका आरोग्य पर्यवेक्षक संजय काशीनाथराव शेजवळ (५९) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १६ तोळे सोने आणि ३० हजार रुपयांची रोख, असा एकूण ११ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शेजवळ कुटुंब २६ जूनला सकाळी १०:३० वाजता घराला कुलूप लावून पर्यटनासाठी निघाले होते. रात्री ते साताऱ्यातील वाई येथे मुक्कामी थांबले. २७ जून रोजी सकाळी ८ वाजता शेजारी पवन देशमुख यांनी फोन करून, “तुमच्या घराचा दरवाजा उघडा दिसत आहे,’ असे सांगितले. त्यांनी मागचा दरवाजा पाहिला असता कडी तुटलेली आणि सामान अस्ताव्यस्त दिसले. चोरीचे वृत्त समजताच हादरलेल्या कुटुंबाने ट्रिप रद्द करून तात्काळ परतीचा मार्ग धरला. दुपारी घरी पोहोचल्यानंतर पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे गंठण, साखळ्या, अंगठ्या असा ऐवज गायब होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक गाडेकर पुढील तपास करत आहेत. ‘रेकी’ करून चोरी?
शेजवळ कुटुंब वाईला पोहोचून गाढ झोपेत असतानाच मध्यरात्री हा डल्ला मारण्यात आला. ‘घरमालक आता परत येऊ शकत नाहीत,’ याचा पक्का हिशेब करून चोरट्यांनी कपाटातील २२ दागिने अत्यंत शांततेत शोधले. यावरून टोळीने आधीच ‘रेकी’ केल्याचा दाट संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *