नांदेडच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू; मानवतजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शांतिनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या 24 वर्षीय युवकाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतिनगर येथील रहिवासी करण सुदाम सत्ते (वय 24 वर्षे) हा युवक 22 एप्रिल रोजी घरातून बाहेर पडला होता. घरातून जाताना त्याच्याकडे सुमारे 40 हजार रुपये रोख रक्कम होती तसेच गळ्यात, कानात सोन्याचे दागिने असल्याचे नातलगांनी सांगितले.
दरम्यान, 3 मे रोजी मानवत परिसरातील पोलिसांनी नांदेड येथील कुटुंबीयांना संपर्क साधून एका अज्ञात मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलच्या आधारे माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर कुटुंबीय मानवत येथे पोहोचले असता त्यांना अत्यंत धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. पाण्यात सापडलेल्या मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झालेला असून चेहऱ्याचे मांस नष्ट होऊन केवळ डोक्याचे हाड दिसत असल्याचे नातलगांनी सांगितले. त्यामुळे मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कुटुंबीयांनी हा अपघाती मृत्यू नसून खून झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. युवकाकडे असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने गायब असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची तयारी नातलगांनी दर्शवली आहे.दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अवघ्या तरुण वयात झालेल्या या मृत्यूमुळे शांतिनगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
