Beed News | बीडमधील तलाठी मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! धक्कादायक माहिती समोर
Beed News | बीड (Beed) जिल्ह्यात लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत एका तलाठी अधिकाऱ्याने जीवन संपवल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणात नवीन घडामोड झाली आहे. मृत गणेश दत्तू कोळी यांच्या आईच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या वर्तनामुळे आणि कथित मानसिक त्रासामुळे मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मोरेवाडी (Morewadi) परिसरात घडलेल्या या घटनेबाबत गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी (Sunanda Dattu Koli) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, विवाहानंतर कुलदैवताच्या दर्शनासाठी गेल्यानंतर सुनेच्या वागण्यात बदल जाणवू लागला होता. ती वारंवार कोणाशीतरी लपून मोबाईलवर बोलत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा पार पडली, मात्र त्यानंतरही तिच्या वागण्यात फरक दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
फिर्यादीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित महिलेने हे लग्न स्वतःच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगितले होते. तसेच गणेशसोबत राहण्यास नकार देत ती अंबाजोगाई (Ambajogai) येथे निघून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनांमुळे गणेश मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Beed News | 25 मे रोजी घडली धक्कादायक घटना :
तक्रारीनुसार, गणेश 24 मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईजवळील मोरेवाडी येथे गेला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मे रोजी त्याने आपल्या बहिणीशी दूरध्वनीवर संवाद साधला. त्यावेळी पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त करत तिने डायरीत त्यासंदर्भात काही नोंदी केल्याचे आपण वाचल्याचे त्याने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
यानंतर काही वेळातच पत्नी राहत असलेल्या खोलीत गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. गणेश दत्तू कोळी (Ganesh Dattu Koli) यांनी 2021 मध्ये राज्य राखीव पोलीस बलात (State Reserve Police Force) पोलीस शिपाई म्हणून सेवा सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी तलाठी परीक्षेची तयारी करून 2024 मध्ये चंद्रपूर (Chandrapur) येथे तलाठी पद मिळवले होते. 13 मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांची पत्नी अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात (Forensic Department) कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीसांकडून सुरू आहे.
