दहशतवादी नेटवर्क:हुझैफाला ठाणे कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड, आयएसआय-अंडरवर्ल्डसोबत संबंधाचा संशय
![]()
पाकिस्तानची गुप्तचर संघटना “आयएसआय’ आणि डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय संशयिताला ठाणे न्यायालयाने ५ जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक (स्पेशल सेल) आणि महाराष्ट्र एटीएसने एका संयुक्त कारवाईत या संशयिताला अटक केली होती. न्यायाधीश एस. एन. कन्नुरकर यांनी बुधवारी तपास यंत्रणांना आदेश दिले की, संशयित हुझैफा फारुक अहमद हाश्मी याला नवी दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात यावे. सुनावणीदरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी चॅटिंगचे स्क्रीनशॉट आणि बँक व्यवहारांची माहिती न्यायालयासमोर सादर केली. हुझैफा हा पाकिस्तानातून कारवाया करणाऱ्या यावर खान नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला असून याचीही चौकशी सुरू आहे. मुन्ना झिंगाडाचा जवळचा हुझैफा हा अंडरवर्ल्डमधील प्रमुख नाव असलेल्या मुन्ना झिंगाडाचा जवळचा सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मुन्ना झिंगाडा सध्या कराचीमधून आपल्या कारवाया चालवत असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणा मुंबई अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानची आयएसआय यांच्यातील कथित संबंधांचा तपास करत आहेत. या प्रकरणाच्या संदर्भाने नुकतेच मुंबईत विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून छापे टाकण्यात आले होते.
