Pune News | पुण्यात ‘या’ तारखेपासून पुढील १४ दिवस जमावबंदी! काय सुरू, काय बंद? वाचा सविस्तर नियमावली

0
Pune-Police.webp.webp


Pune News | पुणे (Pune) शहरात विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम तसेच सामाजिक संघटनांच्या मोर्चे आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 9 जूनपासून पुढील 14 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत. या काळात अनेक सार्वजनिक उपक्रमांवर निर्बंध असणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (Dr. Prashant Amritkar) यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. 9 जून रोजी मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते 22 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येऊन सभा, मेळावे किंवा मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत.

मात्र, शासकीय सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच खासगी सुरक्षा रक्षक, गुरखा आणि चौकीदार यांनाही या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने ही उपाययोजना केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News | शस्त्रे, प्रक्षोभक भाषणे आणि रिल्सवरही निर्बंध :

प्रतिबंधात्मक आदेशांनुसार कोणत्याही प्रकारचे स्फोटक पदार्थ किंवा ज्वलनशील द्रव्य सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तलवारी, भाले, काठ्या, बंदुका किंवा इजा पोहोचवू शकणारी इतर हत्यारे सोबत ठेवण्यावरही बंदी असणार आहे. याशिवाय कोणत्याही व्यक्ती, नेते किंवा संघटनांच्या प्रतिमा, प्रतीकात्मक पुतळे किंवा प्रेतांचे प्रदर्शन आणि दहन करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

सार्वजनिक ठिकाणी अश्लील किंवा आक्षेपार्ह घोषणा देणे, गाणी गाणे, वाद्य वाजवणे तसेच समाजात तणाव निर्माण करणारी भाषणे करणे यावरही निर्बंध असतील. सभ्यता आणि शालीनतेला बाधा आणणारे फलक, चित्रे किंवा चिन्हांचे प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन करणारे किंवा गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ, रिल्स किंवा सोशल मीडिया पोस्ट तयार करून प्रसारित करण्यावरही पूर्णपणे बंदी राहणार आहे. अशा माध्यमांतून दहशत निर्माण करणे किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 (Maharashtra Police Act 1951) च्या कलम 135 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

News Title: Pune Imposes 14-Day Restrictions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed