मेळघाटातील पाणीच्या प्रश्नांसाठी आ. कडूंचा मजीप्रा कार्यालयात ठिया:अचलपूर मतदार संघातील रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा
![]()
अचलपूर विधानसभा मतदारसंघासह मेळघाटातील नागरिकांना प्रशासकीय दिरंगाई आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. या समस्येसाठी आमदार कडू यांनी गुरूवारी (दि. ४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया आंदोलन केले. त्यानंतर मजीप्रा आणि जलजीवन मिशन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार बच्चू कडू यांनी चर्चा केली. दरम्यान मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान त्यांनी पाणीप्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा दिला होता. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मेळघाटातील विविध पाणीपुरवठा योजनांबाबतचे प्रश्न, रखडलेले प्रकल्प, निधीअभावी थांबलेली कामे यावर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जोपर्यंत सुरू असलेले प्रकल्प तात्काळ पूर्ण होत नाहीत आणि मेळघाटातील जनतेला नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. तसेच आवश्यक निधीची व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांसह कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान बच्चू कडू आंदोलनाला बसल्याची माहिती मिळताच प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव रंगा नायक यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधून सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठाची कामे ही उन्हाळ्यात तात्काळ पूर्ण झाली पाहिजे, अन्यथा ती पावसाळ्यानंतर पूर्ण करावी लागेल. त्यामध्ये वाढीव निधीची गरज पडणार आणि त्याला वेगळी मान्यता घेण्याची गरज पडणार, त्यामुळे ही प्रक्रिया अडचणीची होईल. म्हणून सदर कामे ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. …तर आता मुंबईत आंदोलन गुरूवारी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद आणि निधी उपलब्धतेचे आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुढचे आंदोलन मुंबई स्तरावर छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
