कर थकित ठेवणाऱ्या दोन मालमत्तांना सील:व्यापाऱ्यांकडे 36 लाखाची थकबाकी, पालिकेची कठोर पावले उचलण्यास सुरुवात
![]()
मालमत्ता कर थकित ठेवणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने मागील काही दिवसांपासून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरात सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत ४ जून रोजी राजापेठ (मध्य झोन क्र. २) भागात मोठी कारवाई करण्यात आली. वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा न करणाऱ्या दोन मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर अखेर प्रशासनाने सील ठोकले. वार्ड क्रमांक बी-६ अंतर्गत मालमत्ता क्रमांक ८०७ व ८०७-१ चे मालमत्ताधारक यांच्याकडे मालमत्ता कराची तब्बल ६ लाख १६ हजार १५ रुपये इतकी थकबाकी होती. वार्ड क्रमांक बी-६ मधील मालमत्ता क्रमांक ३१-१० चे मालमत्ताधारक यांच्याकडे मालमत्ता कराची ३० लाख २९ हजार १२८ रुपये इतकी मोठी थकबाकी होती. या दोन्ही मालमत्तांवरील थकबाकीची एकूण रक्कम ३६ लाख ४५ हजार १४३ रुपये इतकी आहे. मनपाच्या थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमेतील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे. मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य आधार आहे. रस्ते, स्वच्छता, आरोग्य, उद्याने, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी हा महसूल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करणे अपरिहार्य आहे, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धडक कारवाई सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये सहायक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण, निरीक्षक फैयाज खान यांच्यासह वसुली लिपिक सुरज चावरे, रोशन चव्हाण, धरम बिवाड, विशाल डिख्याव यांनी सहभाग घेतला. महसूल पथकाने नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर मालमत्ता सील केल्या. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, थकबाकीदार अद्यापही कर भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा सर्वांवर आगामी काळात सीलिंग, जप्तीची कठोर कारवाईं केली जाईल, असा इशारा मनपाने दिला आहे. एक लाखावर कर थकित असलेले रडारवर शहरात असे अनेक मालमत्ता धारक आहेत, ज्यांच्याकडे १ लाखावर मालमत्ता कर थकित आहेत. अशांवर सध्या मनपाची वक्रदृष्टी पडली असून त्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून मनपाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला थकित मालमत्ता कर वसुल करता येईल. मनपाने थकित करावरील दंडात सुट दिल्यानंतरही अनेक मालमत्ता धारकांनी कर भरला नसल्याने मनपाला आता कठोर भुमिका घ्यावी लागली आहे.
