पुण्यातील बडतर्फ महिला पोलिस सोनाली हिंगेंचा जामीन फेटाळला:'पॉक्सो'ची भीती दाखवत प्राचार्यांकडून वसूल केली होती खंडणी

0
new-project-2026-06-05t115603317_1780640839.jpg




अल्पवयीन मुलीचा वापर करून शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ‘पॉक्सो’ कायद्याची भीती दाखवत 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी फेटाळून लावला आहे. या गुन्ह्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे, छायाचित्रे, गुन्ह्यासाठी वापरलेली उपकरणे जप्त करण्यासाठी आणि खंडणीच्या रकमेचा छडा लावण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. नेमके प्रकरण काय? हे संपूर्ण प्रकरण 18 ते 28 जुलै दरम्यान घडले असून, पुण्यातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्याला चार पोलिसांनी मिळून लक्ष्य केले होते. प्राचार्यांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची आणि अटक करण्याची भीती दाखवून प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी 7 लाख रुपयांची मागणी केली होती. कायदेशीर कारवाई आणि बदनामीच्या भीतीने प्राचार्यांनी ही रक्कम दिली, मात्र हा प्रकार खंडणीखोरीचा असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी थेट वरिष्ठ स्तरावर दाद मागितली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल होताच सोनाली फरार तक्रारीनुसार, बंडगार्डन पोलिस ठाण्यात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे, अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे आणि दामिनी पथकातील मार्शल तथा सोशल मीडियावरील ‘रील स्टार’ सोनाली हिंगे यांच्याविरोधात खंडणी उकळणे आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी अजित बडे आणि सुदाम तायडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या सोनाली हिंगेने अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सरकारी वकील सुनील हांडे यांनी आरोपीने तिच्या अधिकारक्षेत्रात नसलेल्या महाविद्यालयात जाऊन कर्तव्यात कसूर केल्याचा युक्तिवाद करत जामिनाला कडक विरोध केला, जो न्यायालयाने ग्राह्य धरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *