दोन तारखा, दोन पिढ्या, एकच विश्वास; अनिकेत तटकरेंची पोस्ट व्हायरल:कोकणात बिनविरोध विजय, भावूक पोस्ट चर्चेत

0
730-x-548-new-2026-06-05t121808080_1780642784.jpg




कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे. या मतदारसंघात सुरुवातीला अनिकेत तटकरे आणि महाविकास आघाडी समर्थित बाळ माने यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी बाळ माने यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. या विजयानंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अनिकेत तटकरे यांनी दोन तारखा, दोन प्रवास आणि एक विलक्षण योगायोग याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, 24 मे 2018 हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. याच दिवशी त्यांना प्रथमच आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर नेमके एका वर्षाने म्हणजे 24 मे 2019 रोजी खासदार सुनील तटकरे प्रथमच लोकसभेवर निवडून गेले. या दोन घटनांनी त्यांच्या राजकीय प्रवासात विशेष स्थान निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. अनिकेत तटकरे यांनी पुढे आणखी एका योगायोगाकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, 4 जून 2024 रोजी जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत सुनील तटकरे यांना दुसऱ्यांदा लोकसभेत पाठवले. त्यानंतर नेमक्या दोन वर्षांनी म्हणजे 4 जून 2026 रोजी स्वतःला दुसऱ्यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली. हा केवळ तारखांचा योगायोग नसून जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची साथ आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यांचे फलित असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना अभिमानापेक्षा कृतज्ञतेची भावना अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली, तर काही ठिकाणी प्रमुख पक्षांनी अपक्षांना पाठिंबा दिला. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघांमध्ये महायुती समर्थित उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. पहिल्या टप्प्यात महायुतीची आघाडी या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी, पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांचा समावेश आहे. या निकालांनंतर महायुतीने विधान परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महत्त्वाची आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *