लाच खोर मुख्याध्यापकाला ६ जून पर्यंत पोलीस कोठडी
नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१) यांनी आपल्या विद्यालयातीलच लिपिकाकडे लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणात कंधार येथील विशेष न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापकाला ६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील ३८ वर्षीय तक्रारदार हे मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक राजेश पडलवार यांनी विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाखाली जानेवारी २०२६ ते मे २०२६ या पाच महिन्यांसाठी दरमहा १२ हजार रुपये याप्रमाणे एकूण ६० हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच, तक्रारदाराची इतरत्र बदली करून देण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही नोटीस अथवा प्रशासकीय कारवाई न करण्यासाठीही ही रक्कम देण्याची अट घातली होती.
मुख्याध्यापकांकडून वारंवार होत असलेल्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार आरोपी मुख्याध्यापकांनी मागितलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान पंचांसमक्ष सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचे धडे देणाऱ्या संस्थेच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याने शिक्षक, पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्याकडूनच लाचेची मागणी केल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
अटकेनंतर आरोपी मुख्याध्यापकाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासाच्या दृष्टीने अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि प्रकरणातील इतर बाबींची चौकशी करण्यासाठी एसीबीने पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर सुनावणी करताना कंधार येथील विशेष न्यायालयाने आरोपी राजेश पडलवार यांना ६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातमी ….
