[ads1]
![]()
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वरची भागुची वाडी अंगणवाडीत बालके आणि गरोदर मातांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी मदतनीस महिलेला मात्र मानसिक छळाला कंटाळून आपला राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे एकात्मिक बाल विकास विभागाच्या एकूणच कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंगणवाडी मदतनीस उर्मिला पारधी यांनी प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी आणि अलिबाग कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये त्यांनी अंगणवाडी सेविका बी. जी. निरगुडा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गरोदर मातांना मिळणाऱ्या ‘अमृत आहार’ योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असून, प्रत्यक्षात आहार न देताच लाभार्थ्यांच्या नावावर तो वितरित केल्याचे दाखवण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. निकृष्ट आहाराचे धक्कादायक वास्तव पारधी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अंगणवाडीत लहान मुलांना दिली जाणारी डाळ सडलेली आणि कीड लागलेली होती. तसेच, साखरेमध्ये उंदराची विष्ठा आढळूनही तीच साखर आहारात वापरण्यात आली. यासोबतच मुलांना खायला दिलेली केळीदेखील खराब होती. या निकृष्ट अन्नाचे पुरावे म्हणून छायाचित्रेही वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहेत. शिवाय, एका गरोदर महिलेकडे आधार कार्ड नसल्याचे कारण पुढे करत तिला आहार नाकारला, पण दप्तरी मात्र तिच्या नावावर आहाराचे वाटप दाखवल्याचा आरोपही पारधी यांनी केला आहे. मानसिक छळाला कंटाळून राजीनामा या गंभीर गैरप्रकारांची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर उर्मिला पारधी यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली गेली, तसेच शिवीगाळ करून मानसिक त्रास देण्यात आला. या सततच्या जाचाला आणि दबावाला कंटाळूनच अखेर उर्मिला पारधी यांनी आपल्या मदतनीस पदाचा नाईलाजाने राजीनामा दिला आहे. पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती गेल्याच महिन्यात पुणे जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेने कुकरला दहा शिट्ट्या होऊनही वाटाणा शिजत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल करत निकृष्ट आहाराचे वास्तव समोर आणले होते. त्यावेळी प्रशासनाने थेट त्या सेविकेलाच बडतर्फ केले होते, मात्र समाजमाध्यमांवरील वाढत्या रोषानंतर ती कारवाई मागे घेण्यात आली. आता कर्जतमध्येही भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्या मदतनीस महिलेला राजीनामा देण्यास भाग पाडले गेल्याने संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
[ads2]
कर्जतमध्ये बालके व गरोदर मातांच्या आहारावर डल्ला:भ्रष्टाचाराला वाचा फोडणाऱ्या मदतनीसावर राजीनाम्याची वेळ; अमृत आहार योजनेत मोठा गैरव्यवहार
















Leave a Reply