[ads1]
![]()
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डीजे बंदीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “डीजे बंदी झाली पाहिजे, हेच आमचे स्पष्ट मत आहे. डीजे बंदीमुळे काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या; मात्र लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की आनंद?”, असा सवाल शिरसाट यांनी केला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले. गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवातील मिरवणुका, ध्वनीप्रदूषण, कायदा-सुव्यवस्था आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. डीजेमुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांना त्रास डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे केवळ मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांनाच नव्हे, तर रस्त्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो, असे शिरसाट यांनी सांगितले. “डीजेमुळे अनेक लहान बालके, वयोवृद्ध आणि आजारी लोकांना त्रास होतो. ज्या-ज्या ठिकाणाहून मिरवणूक जाते, त्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो,” असे ते म्हणाले. मिरवणुकीतील मोठ्या आवाजामुळे लहान मुलांना उत्सवाचा आनंद घेणेही कठीण होते. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना इतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. पारंपरिक वाद्यांवर गणेशोत्सव साजरा करा गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि श्रद्धेचा सण असला तरी तो पारंपरिक पद्धतीने साजरा करता येतो. त्यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन शिरसाट यांनी केले. मागील वर्षीही प्रशासन आणि गणेश मंडळांकडून डीजे न वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि त्याला मंडळांनी प्रतिसाद दिला होता, असा दावा त्यांनी केला. “गेल्या वेळी आम्ही आवाहन केले होते. त्याची अंमलबजावणी झाली. सर्वांनी ऐकले आणि तेवढ्याच उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. त्यामुळे याही वर्षी आम्ही सर्व गणेश मंडळांना विनंती केली आहे की, पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा,” असे शिरसाट म्हणाले. या शहरात डीजे वाजणार नाही – संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर हे संवेदनशील शहर असल्याचे सांगत यंदाही डीजेच्या वापराबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. “छत्रपती संभाजीनगर हे शहर संवेदनशील आहे. गेल्या वर्षीही डीजे बंदीचा निर्णय आम्ही घेतला होता. याही वर्षी सर्वांनी ठरवले आहे की, या शहरात डीजे वाजणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यावर त्यांनी भर दिला. उत्सवाचा आनंद साजरा करताना इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकांचा जीव महत्त्वाचा की आनंद? डीजेच्या मोठ्या आवाजामुळे काही नागरिकांना आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे उत्सवाचा आनंद महत्त्वाचा असला तरी नागरिकांचे आरोग्य आणि जीव त्याहून अधिक महत्त्वाचे आहेत, अशी भूमिका शिरसाट यांनी मांडली. “लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की आनंद करणं महत्त्वाचं आहे? लोकांच्या आरोग्याशी खेळून उत्सव साजरा करण्याची गरज नाही. पारंपरिक वाद्यांसहही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता येतो,” असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. ‘काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या’ डीजे बंदीच्या निर्णयामुळे काही जण नाराज होण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्णय घेतला असल्याने त्याबाबत मागे हटणार नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. “डीजे बंदीमुळे काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या. मात्र, नागरिकांना त्रास होणार असेल तर तो थांबवला पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान, पुण्यात गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावरून सध्या वाद सुरू आहे. ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे सजग नागरिक विद्यानंद बापट यांच्या भूमिकेवरूनही वाद निर्माण झाला असून त्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांनी गणेशोत्सव सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन केले आहे. त्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांनीही डीजे बंदीची स्पष्ट भूमिका मांडल्याने गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. हेही वाचा.. देशात धर्माची झिंग:लोकांना धर्मांध करून मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, दुसरीकडे लावा- राज ठाकरे राज्यातील जनतेना वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. देशात धर्मांची झिंग आली आहे, देवावरची श्रंद्धा, धर्माबद्दलचा अभिमान इतके आपण समजू शकतो पण माणसांनी धर्मांध असू नये. आपल्या धर्मांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, पण ज्या प्रकारे देशात वातावरण आहे ते तयार केले जात आहे, तुमच्यामध्ये राग निर्माण केला जात असून तुमचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत,असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..
[ads2]
‘डीजे बंदीमुळे काहींना वाईट वाटत असेल तर वाटू द्या’:संजय शिरसाटांची ठाम भूमिका, ‘लोकांचा जीव महत्त्वाचा की आनंद?’
















Leave a Reply