दाटेगावातील कामे पाहून राज्यस्तरीय तपासणी पथक भारावले:गावकऱ्यांच्या एकजुटीतूनच गावाचा कायापालट- ग्रामविकास सचिव चंद्रकांत पुलकुंडवार

[ads1]


गावकऱ्यांची एकजूटच गावाच्या विकासासाठी महत्वाची असून एकजूटीने गावाचा कायापालट होऊ शकतो हे पुन्हा एकदा दिसून आल्याची उत्फुर्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाच्या राज्यस्तरीय पथकाने व्यक्त केली आहे. दाटेगाव (ता. हिंगोली) येथे तपासणीच्या निमित्ताने पथक आले होते. यावेळी गावाची पाहणी केली. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानामध्ये हिंगोली तालुक्यातील दाटेगाव या गावाने विभागात दुसरा क्रमांक मिळविला.त्यामुळे गावाची राज्यस्तरावर निवड झाली. त्यानुसार ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, आदर्श गाव संकल्प समितीचे पोपटराव पवार यशदा पुणेचे संचालक मल्लीनाथ कलशेट्टी, पंचाय राज अभियानाचे संचालक गिरीष भालेराव, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील, राज्य व्यवस्थापन कक्षाचे राजाराम दिघे यांच्या पथकाने शनिवारी ता. 5 दाटेगाव येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय पथक गावात दाखल होताच गावकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी पथकाने गावातील सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षलागवड, अंगणवाडी, गावातील विकास कामे, ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. गावातील स्वच्छता पाहून त्यांनी गावकऱ्यांचे कौतूक केले. लोकसहभागातून केलेली वृक्षलागवडीची पाहणी करून वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जातो ऐकून पथकाने गावकऱ्यांच्या उपक्रमाचे कौतूक केले. गावात शासकिय योजनांचा पुरेपुर लाभ घेत महिला बचत गटांनी लहान , मोठे व्यवसाय सुुरू करून आर्थिकदृष्टया सक्षम झाल्याचे सांगितले. या सोबतच ग्रामपंचायत अधिकारी उत्तम आडे यांनी गावामध्ये दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन प्रशासनाचे अधिकारी व गावकऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचे स्पष्ट केले.गावकऱ्यांच्या एकजूटीतून गावाचा कायापालट होतो याचे दाटेगाव हे उत्तम उदाहरण असून गावकऱ्यांनी यामध्ये सातत्य ठेवावे असे आवाहन ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. गावात स्मशानभुमी व परिसरात 1 हजार पेक्षा अधिक झाडे लाऊन त्यांचे संगोपन करण्यात आले. गावातील घरांना मुलींची नावे देऊन मुलगा मुलगी एकसमानचा संदेश दिला. गावावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असून सर्व प्रभागात तसेच सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. गावकऱ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावले जाते. कचरा संकलनासाठी घंटागाडी, भुमीगत गटार योजनेमुळे सांडपाणी गावाबाहेर काढण्यात आले. गावकऱ्यांना शुध्द पाण्याचा पुरवठा यासह इतर कामे करण्यात आली. दरवर्षी शंभर टक्के करवसुली होत असून ऑनलाईन कराचा भरला केला जातो

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *