जर्मनीतील आयटी इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या:मायदेशी परतताच टोकाचे पाऊल

[ads1]


जर्मनीमध्ये एका नामांकित कंपनीत उच्च पदस्थ आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेला तरुण आठ दिवसांपूर्वीच मायदेशी परतला होता. मात्र, कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या मानसिक तणावात त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे घडली. अमोल सुखराज गाढवे असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गाढवे हे गेल्या काही वर्षांपासून जर्मनीमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत होते. उच्चशिक्षित असलेल्या अमोल यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परदेशात करिअरमध्ये यश मिळवले होते. ते जर्मनीतील एका नामांकित कंपनीत उच्च पदस्थ आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होते. काही दिवसांसाठी ते मायदेशी आले होते आणि अवघ्या आठ दिवसांपूर्वीच पुण्याजवळील कुंजीरवाडी येथील आपल्या घरी परतले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या वादांमुळे अमोल गाढवे मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच तणावातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. परदेशात चांगली नोकरी, यशस्वी करिअर आणि कुटुंब असा संसार असताना अमोल यांनी अचानक आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे. घटनेची माहिती मिळताच कुंजीरवाडी परिसरात शोककळा पसरली. अमोल गाढवे यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. परदेशात यशस्वी करिअर घडवणाऱ्या एका तरुणाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 09:00 वाजता कुंजीरवाडी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अमोल गाढवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामागील नेमके कारण काय होते, याबाबत पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. हिंजवडीच्या पायाभूत सुविधांसाठी आयटी कर्मचारी रस्त्यावर:इन्फोसिस सर्कलपासून मोर्चा, आदित्य ठाकरेही सहभागी हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील खराब रस्ते, वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषण आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, 6 सप्टेंबर रोजी आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढला. हिंजवडी फेज- 1 येथील इन्फोसिस सर्कलपासून या मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरेही या मोर्चात सहभागी झाले. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *