अकोट पोलिसांची कारवाई; 174 जण केले तडीपार:कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा ॲक्शन मोड; ड्रोन, सीसीटीव्हीसह शहरात चोख बंदोबस्त‎

[ads1]


शहरात सोमवारी ७ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या कावड शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर अकोट शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. संभाव्य उपद्रवी घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी तब्बल १७४ जणांना तडीपार केले आहे. शांतता भंग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवायांसोबतच संपूर्ण कावड मार्गाची पाहणी करून शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अकोटमध्ये निघणाऱ्या या कावड उत्सवाला २२ वर्षांची परंपरा आहे. यंदा या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली असून ‘नशापानमुक्त कावड उत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक श्रद्धेसोबतच व्यसनमुक्तीचा संदेश देण्यावर भर राहणार आहे. मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी होणार असल्याने पोलिसांनी आधीच उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेसाठी १० पोलीस अधिकारी, ९० कर्मचारी आणि ५८ गृहरक्षक दलाचे जवान तैनात राहतील. तसेच एसआरपीच्या दोन प्लाटून, आरसीपीची एक प्लाटून, सीसीटीव्ही व्हॅन, १० महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे संपूर्ण यात्रेवर नजर ठेवली जाणार आहे. उत्सव शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *