Hardik Pandya | विराटनंतर आता हार्दिक पांड्याचाही पत्ता कट होणार? टीम इंडियाच्या गोटात मोठी खळबळ; ‘हे’ ठरले मुख्य कारण!
Hardik Pandya | आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा 6 जून रोजी होणार असून त्याआधी एक मोठी चर्चा रंगली आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला टी-20 संघातून विश्रांती दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यामागे त्याची खराब कामगिरी किंवा तातडीची दुखापत कारणीभूत नसून भारतीय संघ व्यवस्थापनाचे दीर्घकालीन नियोजन असल्याचे बोलले जात आहे.
पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका (South Africa) येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय निवड समिती आतापासून तयारी करत आहे. तेथील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर हार्दिक पांड्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे त्याला अधिकाधिक एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळावी आणि त्याचा कार्यभार योग्य पद्धतीने व्यवस्थापित करता यावा, यासाठी टी-20 क्रिकेटमधून काही काळ दूर ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे समोर आले आहे.
अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिकची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत त्याच्या फलंदाजीसोबतच गोलंदाजीवरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. विशेषतः तो पूर्ण 10 षटके टाकू शकतो का, याची निवडकर्ते बारकाईने चाचपणी करणार आहेत. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याला सर्वोत्तम स्थितीत तयार ठेवणे हेच भारतीय निवड समितीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मानले जात आहे.
Hardik Pandya | दुखापतींचा इतिहास आणि पर्यायांची चाचपणी :
हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीत दुखापती वारंवार अडथळा ठरल्या आहेत. आयपीएल 2026 (IPL 2026) स्पर्धेदरम्यान त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रास झाला होता. त्यामुळे साखळी फेरीतील चार ते पाच सामने त्याला गमवावे लागले. याआधीही दुखापतींमुळे तो अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून दूर राहिला होता. आशिया कप 2025 (Asia Cup 2025) दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती आणि त्यानंतरचा ऑस्ट्रेलिया (Australia) दौराही मुकावा लागला होता.
मात्र दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर त्याने टी-20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) मध्ये भारताच्या यशात मोठे योगदान दिले. स्पर्धेतील नऊ डावांमध्ये त्याने 160.74 च्या स्ट्राइक रेटने 217 धावा केल्या, तर गोलंदाजीतही नऊ विकेट्स घेतल्या. तरीदेखील भविष्यातील मोठ्या स्पर्धांचा विचार करून त्याला आयर्लंड (Ireland) आणि इंग्लंड (England) दौऱ्यांतील टी-20 मालिकांपासून दूर ठेवले जाऊ शकते. त्याच्या अनुपस्थितीत शिवम दुबे (Shivam Dube) आणि नितीश रेड्डी (Nitish Reddy) यांना अष्टपैलू पर्याय म्हणून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
