हदगावमध्ये घरफोडी; कपाटातील ३ लाखांची रोकड लंपास
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते २ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. हदगाव येथील आझाद चौक परिसरात राहणारे शेख शमीन शेख अमीनसाब कुरेशी (वय ५१ वर्षे) यांच्या घरातील कपाटाचे लॉकर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यामधील ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली.
या घटनेनंतर शेख कुरेशी यांनी हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक १८१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कामाला लागले आहे. घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बर्गे करीत असून चोरट्यांचा लवकरच माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
