तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस..:उसाच्या पंचनाम्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची कृषिमंत्री भरणेंकडून थट्टा? VIDEO

0
new-project-2025-09-20t1655406871758367487_1781088515.jpg




नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजाची लोकप्रतिनिधींकडून कशी थट्टा केली जाते, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकवासला परिसरातील जळालेल्या उसाच्या पिकाचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी, या आशेने कृषिमंत्र्यांच्या दारात पोहोचलेल्या एका हताश शेतकऱ्याची राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थट्टा केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका होत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, खडकवासला भागातील एका शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाला होता. हवालदिल झालेला हा शेतकरी सरकारी मदतीसाठी आणि जळालेल्या पिकाच्या पंचनाम्याची याचना घेऊन थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचला होता. शेतकऱ्याने मंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडण्याचा आणि उसाचे झालेले नुकसान सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कृषिमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी अत्यंत अनादराने आणि दुर्लक्षाची भूमिका घेतली. “तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे,” असे उपरोधिक वक्तव्य करत मंत्री भरणे यांनी शेतकऱ्याला झटकले. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून न घेताच ते तरातरा आपल्या शासकीय कारमध्ये बसले आणि तिथून निघून गेले. व्हायरल व्हिडिओत नेमके काय? जळालेल्या उसाचे पंचनामे होऊन मदत मिळावी, या आशेने हवालदील झालेला शेतकरी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी पोहोचला होता. तिथे शेतकरी आणि मंत्र्यांमध्ये झालेला संवाद अत्यंत धक्कादायक आहे. शेतकरी: “मामा, जळालेल्या उसाचे पंचनामे करायचे आहेत…” दत्तात्रय भरणे: “नाही, माझ्याकडे तुमचे नाही. मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे मी. तुम्ही मोठी माणसे आहात सगळी. मोठ्या माणसांचे ऐकून सगळं करणार. तुम्हाला ज्यांनी सांगितले, त्यांना हे करायला सांगा.” शेतकरी: “मामा, तुम्ही शब्द दिला होता…” (शेतकऱ्याने जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली). दत्तात्रय भरणे: “नाही, मी नव्हता शब्द दिला. तुमचा आणि माझा काही शब्द झालेला नाही. तुम्ही आंदोलन केले होते. परत शब्द नाही दिला.” आंदोलनाचा राग शेतकऱ्यावर? कृषीमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे, शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनाचा राग मंत्री महोदय मनात धरून आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्याने अत्यंत आर्ततेने ‘मामा’ म्हणून साद घातली आणि दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. मात्र, “ज्यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले, त्यांच्याकडूनच पंचनामे करून घ्या,” असे थेट सुनावत मंत्र्यांनी मदतीचा हात देण्यास साफ नकार दिला. सोशल मीडियावर संतापाची लाट आपल्याच विभागाच्या सर्वोच्च मंत्र्यांकडून अशी वागणूक मिळाल्याने तो शेतकरी पुरता खचून गेला. मंत्र्यांच्या या असंवेदनशील वागणुकीचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो आहे. “अन्नदात्याची अशी थट्टा करणारे कृषिमंत्री काय कामाचे?” असा सवाल करत नेटकऱ्यांनी मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ऐन संकटाच्या काळात मंत्र्यांनी दाखवलेल्या या ‘साधेपणा’च्या अजब नमुन्यामुळे आता राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed