अमरावती विधान परिषद:विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद, संपत्तीच्या तपशिलातील त्रुटीमुळे निर्णय; हायकोर्टात आव्हान देणार

0
aee31566-87d1-407a-8093-c6adb24a10de_1780416559796.jpg




विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आला आहे. संपत्तीच्या तपशिलातील त्रुटी आणि ते विशिष्ट फॉरमॅटमध्ये नसल्याच्या आक्षेपावरून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासमोर उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना, बाजोरिया यांनी अर्जासोबत जोडलेले संपत्तीचे तपशिल अर्धवट असून ते निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याचे इतर चार उमेदवारांनी निदर्शनास आणले. यासंदर्भात संबंधित उमेदवारांनी आपापल्या वकिलांमार्फत लेखी पत्रही सादर केले होते. या आक्षेपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ५ वाजता सुनावणी निश्चित केली. सुनावणीदरम्यान तब्बल साडेतीन तास युक्तिवाद करण्यात आला. आक्षेपकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रशांत देशपांडे, ॲड. नितीन कोल्हटकर, ॲड. संदीप गुप्ता, ॲड. चंद्रशेखर डोरले आदींनी बाजू मांडली. हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या विप्लव बाजोरिया यांनी अमरावतीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. अखेरीस, निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विप्लव बाजोरिया म्हणाले, “सर्वांनी मिळून माझा अर्ज बाद करण्यासाठी कटकारस्थान केले आहे. संबंधित व्यक्तींमार्फत अधिकाऱ्यांवरही दबाव आणला गेला. त्यामुळे मी उच्च न्यायालयात जाऊन न्याय मागेल.” उमेदवारी अर्जात ज्या ठिकाणी संपत्तीबाबतच्या तपशिलांची विचारणा करण्यात आली होती, त्याठिकाणी बाजोरिया यांच्या अर्जात केवळ ‘परिशिष्ट सोबत जोडले आहेत’ असे नमूद केले होते. ही बाब निवडणूक आयोगाने दिलेल्या अर्जाशी सुसंगत नसल्याने हे तपशिल पुरेसे नाहीत, असा आक्षेपकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद होता. तर, सदर अर्जातील माहिती योग्य असल्याचे बाजोरिया यांच्या वकिलांनी स्पष्ट केले होते. या घडामोडीनंतर आता अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात केवळ चारच उमेदवार उरले आहेत. यामध्ये महायुतीतर्फे भाजपचे प्रवीण पोटे, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे हर्षजीत देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा आणि अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed