पुणे शहरात अपघातांचे सत्र:4 ठार, 3 गंभीर जखमी; पुणे-सातारा महामार्ग, बाणेर, केसनंद, खराडी येथे वेगवेगळ्या घटना
![]()
पुणे शहरात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या भागांत झालेल्या रस्ते अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनांमध्ये एका तीन वर्षांच्या बालकासह एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात पुणे-सातारा रस्ता, बाणेर, पुणे-अहिल्यानगर रस्ता (केसनंद) आणि खराडी या परिसरांमध्ये घडले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील राव हॉस्पिटलसमोर २ फेब्रुवारी रोजी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दीपक चंद्रकांत पांगारे (वय ५९, रा. शिवगोरक्ष अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पांगारे हे दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी अचानक घसरली आणि ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार एस. पी. लोहार यांनी फिर्याद दिली आहे. बाणेर फाटा परिसरात वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून खाली पडून एका मजुराचा मृत्यू झाला. हरिदास भाऊसाहेब जगताप (वय ६२, रा. ढोर आळी, शिरुर) असे मृत मजुराचे नाव आहे. जगताप हे वीटभट्टीवरून विटा घेऊन आलेल्या ट्रकमधील थप्पीवर बसले होते. बाणेर फाटा येथे विटांच्या थप्पीवरून अचानक तोल गेल्याने ते रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद परिसरात भरधाव ट्रकने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील प्रवासी अलका भरत वाघेला (वय ६३) यांचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला, तर भरत वाघेला हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी भागात भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार पवन पांडुरंग भारंबे (वय ३५, रा. वाघोली) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील त्यांचे नातेवाईक प्रिया कोल्हे (वय ३२) आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा दीपराज हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या कारचालक प्रसाद शिवाजी मोरे (वय २५, रा. वाघोली) याला पोलिसांनी अटक केली आहे. खराडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
