महाराष्ट्राच्या पराक्रमी लेकीचे कोडकौतुक:वय वर्ष 11, शिखर सर केले 16; ठाण्याच्या गृहिताचा मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून गौरव

0
hjzvmtcakaatmr3_1780403353.jpg




ठाणे येथील युवा गिर्यारोहक ग्रिहिथा स्नेहा सचिन विचारे हिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी भारतातल्या 16 राज्यांतील 16 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम केला. “मिशन इंडिया समिट – 16 राज्ये, 16 शिखरे” या मोहिमेअंतर्गत अवघ्या 32 दिवसांत ग्रिहिथाने हा इतिहास रचला. या अद्वितीय यशाबद्दल आज मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ग्रिहिथाचा विशेष सत्कार केला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील महिलांना सशक्तिकरणाची प्रेरणा देणाऱ्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले व महिला व बालविकास विभागाच्या वतीने यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. वय खेळण्या-बागडण्याचं आणि शाळेचा अभ्यास करण्याचं… पण याच वयात जर कोणी अंगावर काटा आणणाऱ्या कड्या-कपारींशी आणि बर्फाच्छादित शिखरांशी दोन हात करत असेल, तर थक्क व्हायला होतं! ठाण्याची ११ वर्षांची बाल-गिर्यारोहक ग्रिहिथा विचारे हिने नेमकी हीच किमया करून दाखवली आहे. ‘मिशन इंडिया समिट’ या मोहिमेत तिने केवळ ३३ दिवसांत भारतातील तब्बल १६ राज्यांमधील सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकवून एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. आव्हानांवर स्वार होत 33 दिवसांचा थरार एकामागून एक शिखरं सर करण्याचं हे आव्हान सोपं नव्हतं. प्रत्येक राज्याचं हवामान वेगळं, भौगोलिक परिस्थिती भिन्न आणि चढाईची काठिण्यपातळी वेगळी. पण गृहिताच्या जिद्दीपुढे या सगळ्या अडचणी फिक्या पडल्या. १ मे रोजी सुरू झालेली ही मोहीम तिने जूनच्या पहिल्या आठवड्यात यशस्वीपणे पूर्ण केली. या मोहिमेत तिने पार केलेले काही प्रमुख टप्पे आणि शिखरे खालीलप्रमाणे आहेत: महाराष्ट्राचे अभिमान: कळसूबाई शिखर दक्षिण भारताची आव्हानं: केरळचे ‘अनामुडी’ आणि तामिळनाडूचे ‘दोड्डाबेट्टा’ पूर्व आणि मध्य भारत: पश्चिम बंगालचे ‘संदाकफू’, ओडिसाचे ‘देवमाली’ आणि मध्यप्रदेशचे ‘धुपगढ’ इतर महत्त्वाची शिखरे: राजस्थानचे ‘गुरुशिखर’, गुजरातचे ‘गोरखनाथ’ (गिरनार) यांसह एकूण १६ राज्यांतील सर्वोच्च बिंदू तिने काबीज केले. जिद्द आणि खडतर सराव “हा प्रवास केवळ शारीरिक क्षमतेचा नव्हता, तर मानसिक ताकदीचाही कस पाहणारा होता. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करताना होणारा थकवा बाजूला सारून, गृहिता दररोज नव्या उत्साहाने शिखराकडे पाऊल टाकत होती,” अशी प्रतिक्रिया तिच्या प्रशिक्षकांनी आणि पालकांनी दिली. या मोहिमेसाठी गृहिताने अनेक महिने कठोर सराव केला होता. धावणे, कठीण चढाईचा सराव आणि मानसिक संतुलनाचे धडे यांमुळेच ती इतक्या कमी कालावधीत ही मोहीम फत्ते करू शकली. कौतुकाचा वर्षाव अवघ्या ११ व्या वर्षी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तिथली सर्वोच्च शिखरं पादाक्रांत करणाऱ्या गृहिताचे नाव आता गिर्यारोहण क्षेत्रात आदराने घेतले जात आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिच्यावर आणि तिच्या संपूर्ण कुटुंबावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ठाण्याच्या या ‘सुपरगर्ल’ने ‘इच्छा तिथे मार्ग’ या म्हणीचा जिवंत प्रत्यय संपूर्ण देशाला आणून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed