मित्रांसोबत पार्टी करताना काळाची झडप:चुलीवर जेवण शिजवत असतानाच कोसळली वीज, तरुणाचा मृत्यू; कोल्हापुरातील घटना
![]()
मित्रांसोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या गटावर निसर्गरम्य चिकोत्रा धरण परिसरात काळाने भीषण घाला घातला. धरण क्षेत्रात पार्टीसाठी जेवण बनवत असताना अचानक अंगावर वीज कोसळून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी येथील पाच मित्र सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आजरा तालुक्यातील चिकोत्रा धरणाच्या बॅक वॉटर परिसरात गेले होते. दुपारच्या वेळी पावसाळी वातावरण असताना एका झाडाच्या आडोशाला हे मित्र चुलीवर जेवण बनवत होते. अजित चौगुले (वय २४) आणि रोहित मोरे हे दोघे चुलीवर अन्न शिजवत असतानाच अचानक कडाडत वीज त्यांच्या अंगावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत अजित चौगुले याचा जागीच मृत्यू झाला. रोहित मोरे हा देखील विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने गारगोटी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, इतर तीन मित्र धरणातून पाणी आणण्यासाठी गेले असल्याने ते या आपत्तीतून बचावले. संसाराची स्वप्ने अधुरीच मृत अजित चौगुले यांचा अवघ्या दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. सुखी संसाराची स्वप्ने नुकतीच पाहत असतानाच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा मोठा आधारवड हरपला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ आणि आजी असा मोठा परिवार आहे. ऐन तरुण वयात अजितचे निधन झाल्याने आरळगुंडी आणि नरतवडे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस प्रशासनाकडून पंचनामा घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या या पावसात नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय घेऊ नये, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, या निसर्गरम्य ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेने पर्यटनासाठी जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
