हातभट्टीची दारू अधिकृत करा:शासनालाही महसूल मिळेल; रामदास आठवलेंची मागणी; मराठा आरक्षण आणि ओबीसी उपवर्गीकरणावरही भाष्य

0
new-project-2026-06-02t174635771_1780402592.jpg




आपल्या हटके वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी भिवंडी दौऱ्यात एक अजब मागणी केली आहे. राज्यातील विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकारने ‘हातभट्टीची दारू अधिकृत करावी’, असे अजब विधान आठवलेंनी केले आहे. हे आपले वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी यातून शासनाला महसूल मिळेल आणि गोरगरिबांचे जीव वाचतील, असा दावा केला. पुणे येथे विषारी दारूमुळे २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत आठवले म्हणाले की, “हातावर पोट असणारा मजूर आणि कामगार वर्ग प्रामुख्याने स्वस्त असणारी हातभट्टीची दारू पितो. माझे वैयक्तिक मत असे आहे की, सरकारने हातभट्टीची दारू अधिकृत करावी. यामुळे ही दारू सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणाऱ्या दरात मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यावर शासनाचे कायदेशीर नियंत्रण राहील, ज्यामुळे विषबाधेसारख्या घटना टळतील. यातून शासनाला मोठा महसूलही मिळेल आणि गोरगरीब मजुरांचे जीवही वाचतील.” मराठा-ओबीसी आरक्षणावर मांडली भूमिका मराठा आरक्षणावर बोलताना आठवले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा आदर करत आरपीआयचा पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना दाखले द्यावेत; मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करणे योग्य ठरणार नाही. मूळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा १० टक्के ‘ईडब्ल्यूएस’ गटामध्ये समावेश करून आरक्षण देता येईल. आगामी जनगणनेनंतर सर्व समाजाची खरी आकडेवारी समोर येईल. ज्याची जेवढी लोकसंख्या, त्या प्रमाणात त्याला आरक्षण मिळावे, असेही त्यांनी नमूद केले. जातीव्यवस्था मनातून संपेल तेव्हाच आरक्षण सोडू अनुसूचित जाती-जमातींच्या उपवर्गीकरणावर भाष्य करताना आठवले म्हणाले की, “आजही खेड्यापाड्यात दलितांवर अन्याय होत आहेत. देशात जातीव्यवस्था कायद्याने संपली असली तरी लोकांच्या मनातून ती अद्याप गेलेली नाही. ज्या दिवशी मनातून जातीभेद पूर्णपणे नष्ट होईल, त्या दिवशी आम्ही स्वतःहून आरक्षण सोडण्यास तयार आहोत.” पक्षाच्या विस्तारासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला देताना त्यांनी आरपीआयला केवळ एका समाजापुरते मर्यादित न ठेवण्याचे आवाहन केले. “केवळ एका समाजाच्या मतांवर सत्ता मिळवता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देशभर पोहोचवायचा असेल, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना पक्षात स्थान देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे,” असेही आठवले यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed