Farmer Loan Waiver | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर कर्जमाफीवर शिक्कामोर्तब; पाहा कोणत्या शेतकऱ्यांचे सातबारे होणार कोरे?
Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकरी वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय समोर आला आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कर्जमाफीच्या मागणीला अखेर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून शेतीसाठी नव्याने उभारी घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी संघटना आणि विविध नेत्यांकडून कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात होती. अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मान्सूनच्या तोंडावर हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला औपचारिक मान्यता देण्यात आली आहे. मात्र सध्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या योजनेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात येणार नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून याबाबत सविस्तर घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील अटी, शर्ती आणि इतर निकषांची माहिती पुढील काळात जाहीर होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः नैसर्गिक आपत्ती आणि शेतीतील नुकसानामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
Farmer Loan Waiver | 56 लाख शेतकऱ्यांना लाभ, 2 लाखांपर्यंत कर्जमाफी :
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) कर्जमाफी योजना या नावाने राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्ज वेळेवर फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या संपूर्ण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मागील वर्षी झालेल्या गारपीट आणि नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यासह अनेक नेत्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले होते. त्यानंतर सरकारने 30 जून 2026 पूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यादृष्टीने आता प्रक्रिया पुढे सरकताना दिसत आहे.
