नागपूर विधान परिषद निवडणूक- कोट्यधीश उमेदवारांमध्ये चुरस:संपत्तीत भाजपचे पोतदार आघाडीवर, वार्षिक उत्पन्नात काँग्रेसचे लोंढे पुढे
![]()
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ पक्षाच्या प्रतिष्ठेची नसून, उमेदवारांच्या आर्थिक स्थितीमुळेही चर्चेत आहे. भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे हे दोन्ही प्रमुख उमेदवार कोट्यधीश आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रांनुसार, एकूण संपत्तीच्या बाबतीत डॉ. पोतदार आघाडीवर असले तरी, वार्षिक उत्पन्नात अतुल लोंढे यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून भाजपचे डॉ. राजीव पोतदार समोर आले आहेत. नागपूर विधान परिषदेसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सध्या एकूण ३८ कोटी ५७ लाख रुपयांची संपत्ती आहे. गेल्या साडेसहा वर्षांत त्यांच्या संपत्तीत ११५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची संपत्ती १७.८९ कोटी रुपये होती, ती आता ३८.५७ कोटींवर पोहोचली आहे. डॉ. पोतदार यांच्या एकूण संपत्तीमध्ये १४.०६ कोटी रुपयांची चल संपत्ती आणि २४.५१ कोटी रुपयांची अचल संपत्ती (जमीन, मालमत्ता) समाविष्ट आहे. डॉक्टर पती-पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने, त्यांच्या अचल संपत्तीच्या बाजारमूल्यात झालेली वाढ हे त्यांच्या श्रीमंतीमागचे प्रमुख कारण मानले जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांच्याकडे सुमारे १.७५ कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. एकूण मालमत्तेच्या बाबतीत ते डॉ. पोतदार यांच्यापेक्षा मागे असले तरी, वार्षिक उत्पन्नात त्यांनी आघाडी घेतली आहे. डॉ. राजीव पोतदार आणि त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १०.९३ लाख रुपये आहे, तर अतुल लोंढे आणि त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३८.३१ लाख रुपये इतके नोंदवले गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि आंदोलनांमध्ये सक्रिय असल्याने, या दोन्ही नेत्यांवर प्रत्येकी दोन असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे राजकीय स्वरूपाचे असून न्यायालयात प्रलंबित आहेत. नागपूर विधान परिषदेच्या या निवडणुकीत आता आर्थिक बळ आणि राजकीय चुरस यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
