हिंगोली जिल्ह्यात 58 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची मोठी कारवाई:पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांचा दणका, गुन्हेगारांमध्ये खळबळ
![]()
हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात पोलिस विभागाने कडक कारवाई सुरु केली असून मंगळवारी ता. २ एकाच दिवशी जिल्हयातील तब्बल ५८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये एक वर्ष ते एक महिन्यापर्यंत हद्दपारीची कारवाई झाली असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी काढले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने हद्दपारीची कारवाई होण्याची हि पहिलीच वेळ आहे. हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसायाचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिस दल सक्रिय झाले असून जिल्हाभरात बेकायदेशीर दारु विक्री,मटका अड्डे, जुगार अड्डे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी विशेष पथकेही स्थापन केली आहेत. या पथकाकडून दररोज छापे टाकले जात असून त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच गुन्हेगारी टोळ्यांना लगाम बसावा यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांवर कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी जिल्हाभरातील ठाणेदारांना दिले होते. त्यानुसार पोलिस ठाण्यांनी हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले होते. सदर प्रस्तावांची पोलिस उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, राजकुमार केंद्रे यांनी तपासणी करून त्याचा अहवाल दिला होता. त्यावरून तब्बल ५८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. एकाच वेळी ५८ जण हद्दपार झाल्याने अवैध व्यवसाय करणारे तसेच गुन्हेगारी टोळ्यांमधून एकच खळबळ उडाली आहे. पोलिस ठाणेनिहाय हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची संख्या हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत १२ जणांना हद्दपार करण्यात आले असून हिंगोली शहर: ११, औंढा नागनाथ ७, सेनगाव ७, हट्टा ६, कुरुंदा, ६, बासंबा ६, आखाडा बाळापूर २, नर्सी नामदेव पोलिस ठाण्यांतर्गत दोन गुन्हेगारांचा समावेश आहे. या सर्व गुन्हेगारांना एक वर्ष ते १ महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे
