मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’…:रेडिओ चाहत्यांसाठी आवाजाने जपली संगीताची जादू; रेडिओ ते हार्डडिस्क प्रवास
![]()
मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’… “आवाज की दुनिया के दोस्तो…” अशी साद पडली की आजही कान टवकारणारे अनेक रसिक शहरात आहेत. पण गुलमंडीवर राहणाऱ्या जगन्नाथ बसैये यांची संगीताप्रति असलेली आवड आणि निष्ठा निव्वळ थक्क करणारी आहे. १९७६ मध्ये पत्रलेखनापासून सुरू झालेला त्यांचा गाण्यांच्या फर्माइशीचा प्रवास आज थेट आधुनिक हार्डडिस्कपर्यंत येऊन पोहोचला आहे. संगीत ही विकण्याची वस्तू नसून ती वाटण्याची गोष्ट आहे. या उदात्त भावनेतून जगणाऱ्या या अवलियाने हजारो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बसैये यांचा हा प्रवास १९७६ मध्ये सुरू झाला. मोठ्या भावाचा आदेश मानून दहावीची परीक्षा न देता रसवंती चालवताना त्यांनी गाण्याची आवड जपली. त्या काळात ३ हजार रुपये तोळा सोने असताना त्यांनी मुंबईतून ३,५०० रुपयांचा टेपरेकॉर्डर खरेदी केला होता. सोन्यापेक्षा महागड्या त्या मशीनवरून सुरू झालेला त्यांचा छंद विविध भारती, रेडिओ सिलोन, ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून बहरत गेला. या आवडीपोटी त्यांनी १९३१ ते १९९१ पर्यंतच्या चित्रपटांच्या हिंदी फिल्म गीत कोशाच्या आवृत्त्या संग्रहित केल्या आहेत. त्यांच्याकडे दिनविशेष आणि सण-उत्सवानुसार गाण्यांची अचूक यादी असायची. आजच्या डिजिटल युगातही त्यांनी ७० वर्षे जुन्या टेलिसॉनी च्या रेडिओमध्ये तीन स्पीकर आणि एफएम किट बसवून तो जिवंत ठेवला आहे. आता त्यांनी पुष्पनगरीतील आपल्या खोलीला एका स्टुडिओचे रूप दिले आहे. बसैये यांच्या सांगीतिक निष्ठेची पावती त्यांना अनेक दिग्गजांकडून मिळाली. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाठवलेल्या पत्राला उत्तर म्हणून लतादीदींनी स्वतःच्या हाताने लिहिलेले पत्र बसैये यांना पाठवले होते. इतकेच नव्हे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर आणि दक्षिण मध्य रेल्वेचे तत्कालीन डीआरएमदेखील बसैये यांचे फॅन होते. प्रसंगी आकाशवाणीलाही नमते घ्यावे लागायचे बसैये यांच्याकडे गाण्यांचा आणि त्यांच्या तारखांचा इतका अचूक अभ्यास आहे की जुन्या काळात विविध भारतीवर फर्माईश पाठवताना ते गाण्याचे वर्ष, गायक, संगीतकार असा अचूक संदर्भ द्यायचे. थेट केंद्रप्रमुखांनाही चक्रावून जावे लागायचे. अनेकदा दुर्मिळ गाण्यांच्या फर्माईशीसाठी आकाशवाणीच्या लायब्ररीतून ते गाणे शोधून वाजवावे लागायचे. बदलले तंत्रज्ञान, पण आवाज की दुनिया अथांग सुरुवातीला १,००१ गाण्यांची सीडी मोफत वाटणारे बसैये आता १,५५० गाण्यांचा पेनड्राइव्ह श्रोत्यांना प्रेमाने भेट देतात. आज त्यांच्याकडे ४,५०० सिनेमे आणि ३,५०० ऑडिओ गाण्यांसह ८ हजार ऑडिओ-व्हिडिओ गाण्यांचा खजिना आहे. कॅसेट, सीडी, एमपी-३ ते आता पेनड्राइव्ह आणि हार्डडिस्क असा तंत्रज्ञानाचा प्रवास झाला. साधने बदलली पण बसैये यांच्या मनातील गाण्यांचे स्थान आजही नि:स्वार्थी आणि ताजे आहे.
