मान्सूनपूर्व कामांना वेग:आदिला नदी 97 % स्वच्छतेचा मनपाचा दावा; गाळ स्वत: उचलून 30 लाख बचत

0
orig_7solapur-pullout-pg1-02fbdc7bd-42b7-46c0-a38e-df72_1780900167.jpg




गेल्या वर्षी आदिला नदीला पूर येऊन काही वसाहतीत पाणी शिरल्यामुळे यंदा मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. नगर अभियंता कार्यालय आणि आठ झोनच्या माध्यमातून शहरात मान्सूनपूर्व कामे कामे केली जात आहेत. आदिला नदी स्वच्छतेची जबाबदारी झोन क्रमंाक एक आणि सहाकडे आहे. यंदा नदीपात्रातील प्रवाह सुरळीत राहावा व पूर संकट येऊन नये म्हणून नदीपात्र स्वच्छतेचे काम ९७ % पूर्ण करण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा आहे. विशेष म्हणजे नदीतील गाळ सध्या काठावरच ठेवण्यात आला आहे. यापूर्वी तो कंत्राटदारांमार्फत उचलला जात होता. मात्र यावेळी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी तो मनपाच्या यंत्रणेकडूनच उचलला जाईल, यातून सुमारे २५ ते ३० लाखांची बचत केली जात असल्याचा दावा झोन कार्यालय क्रमांक १ व ६ कडून केला जात आहे. झोन क्रमांक एकच्या माध्यमातून आदिला नदी, कारंबा नाल्याच्या स्वच्छतेची कामे पावसाळ्यापूर्वी केली जातात. मागील वर्षी नाला आणि नदी ओव्हरफ्लो होऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचले होते. याची दखल घेत आयुक्त डॉ. सचिन आेम्बासे यांनी सर्व झोन अधिकाऱ्यांना कडक सूचना देऊन पावसाळ्यापूर्वीच नदी स्वच्छतेचे काम सुरू केले. नगर अभियंता सारिका आकुलवार यांच्याकडे त्याचे नियंत्रण आहे. अजूनही ही कामे पूर्ण झाली नसली तरी नाले, ड्रेनेज लाइन, चेंबर स्वच्छता युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जाते. वार्षिक मक्तेदार साई एन्टरप्रायझेस व महादेव लंगडे यांच्यामार्फत ही कामे सुरू आहेत. त्रुटी निवारणास तयार… कुठे कामे राहिली असतील तर झोन कार्यालयास कळवा कारंबा नाला, आदिला नदी आणि स्पर्श दवाखान्याच्या बाजूचा नाला याची स्वच्छता एप्रिलपासूनच सुरू आहे. आदिला नदी स्वच्छतेचे काम ९७ टक्के झाले आहे. चार दिवसांत ते पूर्ण होईल. सोमवारपासून गाळ उचलण्याचे कामही सुरू होईल. नदी स्वच्छतेत काही त्रुटी राहिली असेल तर झोन कार्यालयाशी नागरिकांना त्वरित संपर्क साधावा, सर्व त्रुटी दूर करू, अशी माहिती झोन क्रमांक एकच्या अधिकारी सुनीता हिबारे व झोन क्रमांक सहाचे अधिकारी जावेद पानगल यांनी दिली. जबाबदारी कुणाची.. दोन झोन कार्यालयांद्वारे केली १४ किलोमीटर स्वच्छतेची कामे बाळे परिसरापासून ते १४ कमानीपर्यंत सुमारे सहा किमी नदीपात्र व नाले स्वच्छतेची जबाबदारी झोन क्रमांक एकवर आहे. तर १४ कमानीपासून ते दमाणी रोड सीएनएस हॉस्पिटलपर्यंतचा सुमारे १० किमी पात्राची जबाबदारी झोन क्रमांक सहाची आहे. नाले आणि आदिला नदीच्या स्वच्छतेसाठी झोन क्रमांक १ कडून सुमारे ४५ तर झोन क्रमांक ६ कडून सुमारे ५० ते ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. वार्षिक मक्तेदाराकडून ही कामे केली जात आहेत. पूर्वी ठेकेदारामार्फत केली जायची गाळाची वाहतूक, यंदा मनपाच्या मशिनरीद्वारेच उचलला जाणार गाळ सध्या नदी स्वच्छतेची कामे दिसत असली तरी त्यातून काढलेला गाळ काठावरच आहे. एक मोठा पाऊस आला की हा गाळ पुन्हा नदीपात्रात जाऊ शकतो. याविषयी विचारणा केली असता, अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी गाळ काढणे आणि त्याची दुसरीकडे वाहतूक करणे यासाठी ७५ लाख रुपये खर्च आला होता. त्यातही सर्वाधिक खर्च हा वाहतुकीचा होता. यंदा मनपा आयुक्तांनी ही वाहतूक ठेकेदारामार्फत न करता मनपाच्या जेसीबी आणि डंपरद्वारे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यंदा फक्त गाळ काढणे व स्वच्छतेसाठीचा खर्च ४५ लाखांपर्यंत जाईल व वाहतुकीचे ३० लाख रुपये खर्चाची बचत होईल, असा झोन अधिकाऱ्यांचा दावा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *