मोदी येथे गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे दोघांचा जीव गेला:यंदाही तशीच स्थिती; आणखी जीव गेल्यावर जाग येणार का ? नागरिकांचा सवाल
![]()
मागील वर्षी मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी दूषित पाण्यामुळे दोन शाळेतील मुलींचा मृत्यू झाला होता. याच परिसरातील देवी मंदिराच्या परिसरात पुन्हा दूषित पाण्याचा विळखा पडला. ज्या दिवशी नळाला पाणी येते, त्या दिवशी ड्रेनेजचे चेंबर तुंबून सर्व घाण पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सांगूनसुद्धा महापालिका लक्ष देत नाही. नागरिकांचा जीव गेल्यावर महापालिका लक्ष देणार का ? असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांतून विचारला जात आहे. देवी मंदिर शेजारी जंगडेकर पिठाची गिरणी व परिसरात पाणीपुरवठा होणाऱ्या दिवशी जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरत आहे. या परिसरातील सर्व ड्रेनेज चेंबर तुंबून घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही. या दूषित पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. समस्या त्वरित सोडवू मोदी परिसरातील तक्रार महापालिकेकडे आली आहे. त्यानुसार या परिसरातील संबंधित महानगरपालिका झोन अधिकारी यांना सांगून ही समस्या त्वरित सोडवायला लावू. नागरिकांना अचडण येणार नाही. व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता मनपा कायमस्वरूपी तोडगा हवा सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ पाहणी करून गळती शोधावी. मोदी परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा. ड्रेनेज चेंबर तात्काळ स्वच्छ करण्यात यावे. अमित मंचले, नागरिक
