पहिल्या आठवडयात (2702) पानटपऱ्यांची झाडाझडती, (30) गुन्हे दाखल;67 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 01 ते 30 जून, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम विरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 7 जून, 2026 दरम्यान संपलेल्या पहिल्या आठवड्यात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड जिल्ह्यात (11), परभणी जिल्ह्यात (9), हिंगोली जिल्हयात (3), तर लातूर जिल्ह्यात (7) अशा एकूण (30) कारवाया करण्यात आल्या असून, एकूण (48) आरोपींकडून 67,02,671/- रुपये किंमतीचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
परिक्षेत्रातील विविध घटकांनी गुटखा विरोधी कारवाई पुढील प्रमाणे :
| जिल्हा | केलेली कार्यवाही | BNS 123 | जप्त मुद्देमाल | आरोपी संख्या |
| नांदेड | 530 | 11 | 25,21,741 | 12 |
| परभणी | 839 | 9 | 12,64,043 | 14 |
| हिंगोली | 724 | 3 | 1,69,531 | 4 |
| लातूर | 609 | 7 | 27,47,356 | 18 |
| एकूण | 2,702 | 30 | 67,02,671 | 48 |
पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम : गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची पानटपऱ्यांवरून होणारी विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनी पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवडयात नांदेड परिक्षेत्रात एकूण (2702) पान टपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, अंमली पदार्थांच्या साठवणुकीची संभाव्य ठिकाणे देखील तपासण्यात येत आहेत.
खबर हेल्पलाइन ला वाढता प्रतिसाद : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिक अवैध व्यवसायांची अचूक माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवत आहेत. नागरिकांनी आपल्या भागातील गुटखा, अंमली पदार्थ व इतर अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी व आपल्या भागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

