पुण्यातून तरुणाचे अपहरण, जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी कट:लोणीकंद पोलिसांनी 300 किमी पाठलाग करत 7 आरोपींना अटक केली
![]()
पुण्यातून एका २९ वर्षीय तरुणाचे जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी अपहरण करण्यात आले होते. लोणीकंद पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३०० किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून या तरुणाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार महिलेसह सात आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित तरुणाचे नाव निलेश लक्ष्मण बोड्रे (वय २९, रा. शिंदेवाडी, हवेली, पुणे) असे आहे. आरोपी महिला सोनाली बालाजी निर्वाळ (वय २७, रा. भाग्यनगर, परभणी) हिला निलेशसोबत जबरदस्तीने लग्न करायचे होते. यासाठी तिने इतर साथीदारांच्या मदतीने निलेशच्या अपहरणाचा कट रचला होता. २७ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील ए.पी. पेट्रोल पंपाजवळील ‘शिवनेरी मिसळ’ समोरून निलेशला अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारमध्ये जबरदस्तीने कोंडून पळवून नेले. निलेशचे भाऊ अजय लक्ष्मण बोड्रे यांनी तात्काळ पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी पाच पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने रवाना केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी परभणी-बीडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. लोणीकंद पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, बीड आणि परभणी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. बीडमधील माजलगाव येथे आरोपींना पकडून निलेश बोड्रे याची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणी सोनाली निर्वाळ (वय २७), सुदाम माणिक ताठे (वय २३), शेख सोहेल शेख अफसर (वय २१), देवीदास भगवान पांजगे (वय २१), वैभव मिलिंद शेळके (वय २२, सर्व रा. परभणी), सारंग भगवानराव काकडे (वय ३३, रा. नांदेड) आणि प्रसाद बंडू गवळी (वय २७, रा. परभणी) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
