अनुसूचित जाती प्रकरणांमध्ये पोलीस उप अधीक्षक राजकुमार केंद्रे आरोपींना सहकार्य करतात – रिपब्लिकन सेनेचा आरोप
हिंगोली जिल्ह्यातील वसमत व ग्रामीण उपविभाग हिंगोलीचा पदभार राजकुमार केंद्रे यांच्याकडे असून, त्यांच्या कार्यकाळात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनेक प्रकरणांमध्ये आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथील बौद्ध शेतकरी किर्तने यांच्या उभ्या उसाच्या पिकामध्ये रुलर लावून लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले. तसेच जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपींना पोलिस उपविभागीय अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या वरदहस्तामुळे अटक केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जातीयवादी भूमिका घेणाऱ्या राजकुमार केंद्रे यांच्याकडून तात्काळ पदभार काढून घ्यावा तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांतील आरोपींना तातडीने अटक करावी, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, लिगल सेल महाराष्ट्र नेते ऍड. रावण धाबे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. भिमानंद काळे, सुरेश किर्तने, बालाजी बोडखे, पवार, यशवंतराव साळवे आदी उपस्थित होते.
Post Views: 490
