नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; 25 किलो RDX जप्त:'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर मोठी कारवाई
![]()
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या शस्त्रनिर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत २७ मे रोजी गडचिरोली आणि नारायणपूर (छत्तीसगड) पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा कारखाना उद्ध्वस्त केला. यात इन्सास रायफल्स, १२ बोअर रायफल्स आणि २५ किलो आरडीएक्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यांनी नारायणपूर जिल्ह्यातील काकूर पोलीस ठाण्यापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठा शस्त्रसाठा आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जमिनीत लपवून ठेवल्याचे सांगितले होते. या गुप्त माहितीच्या आधारे, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २६ मे रोजी विशेष अभियान पथक (सी-६०) प्राणहिताच्या ४ तुकड्या, डीआरजी नारायणपूरचे १ पथक आणि बीडीडीएस प्राणहिताच्या २ पथकांनी संयुक्त आंतरराज्यीय शोध मोहीम सुरू केली. २७ मे रोजी जंगलाची कसून तपासणी केली असता, हा मोठा शस्त्रसाठा आणि कारखाना सापडला. सुरक्षेच्या कारणास्तव, शस्त्रनिर्मितीचे काही साहित्य जवानांनी घटनास्थळावरच नष्ट केले. या कारवाईत जप्त केलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये एक इन्सास रायफल, दोन सिंगल शॉट रायफल्स, दोन १२ बोअर रायफल्स आणि १८ जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे. तसेच, २५ किलो आय.ई.डी. स्फोटक, दोन क्लेमोर, ११० डेटोनेटर, ५०० पेक्षा जास्त बिजीएल सेल (आणि ते बनवण्याचे साहित्य), सात बिजीएल लाँचर, तीन ट्यूब लाँचर आणि कॉर्टेक्स वायर जप्त करण्यात आली. शस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीमध्ये दोन लेथ मशीन, दोन इलेक्ट्रिक मोटर्स, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटरी, लोखंडी सळ्या, वायर बंडल आणि सोलर प्लेट्स यांचा समावेश आहे. नक्षलवादी आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगलाचा वापर करून हे साहित्य तयार करत असत. नक्षल सप्ताह किंवा निवडणुकांच्या काळात सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्यासाठी ते हा साठा जमिनीत लपवून ठेवत होते. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचा मोठा घातपाती कट उधळला गेला आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी या कामगिरीत सहभागी असलेल्या सर्व जवानांचे कौतुक केले.
