Pune Tunnel Project | पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार! ‘या’ भागात उभारला जातोय ‘डबल डेकर ट्विन टनल’; पाहा रूट!

0
Pune-Double-Decker-Bridge.webp.webp


Pune Tunnel Project | पुणे (Pune) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भूमिगत रस्त्यांच्या मोठ्या प्रकल्पाला वेग देण्यात आला आहे. येरवडा (Yerawada) ते कात्रज (Katraj) दरम्यान दुमजली भूमिगत मार्ग उभारण्याची योजना अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शहरात एकूण ५४ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी हजारो कोटींचा खर्च अपेक्षित असून, वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येरवडा ते कात्रज या मार्गावर जमिनीखाली दुहेरी स्तराचा ‘डबल डेकर ट्विन टनल’ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. या संपूर्ण भूमिगत रस्ते प्रकल्पासाठी सुमारे ३६ हजार ४१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या कामासाठी जवळपास ५४ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. या टनेलमध्ये आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र ‘एस्केप रूट’चीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

‘मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनीअरिंग कन्सल्टन्सी’ (Monarch Surveyors and Engineering Consultancy) या संस्थेने तयार केलेल्या सविस्तर अहवालात सध्याची वाहतूक स्थिती, भविष्यातील वाहनवाढ, बोगद्यांचे पर्याय, आर्थिक व्यवहार्यता आणि निधी उभारणी यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. हा संपूर्ण अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला असून, प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन म्हणजेच एसपीव्ही (SPV) स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी केलेल्या घोषणेनंतर या प्रकल्पाला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Pune Tunnel Project | वाहतूक कोंडी कमी होणार?

सल्लागार संस्थेने पुण्यातील ४५ वेगवेगळ्या ठिकाणी २४ तास वाहनांची मोजणी, वाहनांच्या वळणांचा अभ्यास आणि प्रवासाच्या प्राधान्य मार्गांचे सर्वेक्षण केले आहे. त्यावर आधारित ट्रॅफिक मॉडेलिंग करण्यात आले. अभ्यासादरम्यान वैभव टॉकीज-हडपसर, हॅरिस ब्रिज, शनिवारवाडा, गणेशखिंड रस्ता आणि खराडी बायपास या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालात सात संभाव्य बोगद्यांचा विचार करण्यात आला असून, त्यापैकी ‘येरवडा-खडी मशिन’ हा मार्ग उत्तर आणि दक्षिण पुण्याला जोडणारा महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणून निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय ‘जगताप डेअरी-सिंहगड रस्ता’ आणि ‘येरवडा-हिंजवडी’ हे मार्गही प्रस्तावित करण्यात आले आहेत.

या भूमिगत रस्त्यांच्या जाळ्यामुळे शहरातील वाहतुकीत १५ ते २२ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. येरवडा ते हिंजवडी (Hinjawadi) हा सध्याचा ७५ मिनिटांचा प्रवास केवळ १६ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो, तर जगताप डेअरी ते कोथरूड (Kothrud) हा प्रवास ६५ मिनिटांवरून फक्त ७ मिनिटांवर आणण्याचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पासाठी १७.६ मीटर व्यासाचा डबल डेकर टनल प्रस्तावित करण्यात आला असून, एकाच बोगद्यात दोन्ही दिशांची वाहतूक सुरू ठेवता येणार आहे. त्यामुळे भूसंपादन कमी होण्यासोबत पर्यावरणीय परिणामही मर्यादित राहतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ म्हणजेच बीओटी (BOT) तत्वावर राबविण्याचा विचार असून, ४० वर्षांचा कालावधी प्रस्तावित आहे. प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ३७ टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ची गरज भासणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

News Title | Pune Plans Twin Tunnel Network

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed