'देऊळ बंद 2' चित्रपटाच्या कमाईतून शेतकरी कन्यांना दत्तक घेणार:'माणुसकीची चळवळ' संस्थेचा पुढाकार, शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक मदत

0
e47927db-227a-4e28-b8d8-e063319dd914_1779961386097.jpg




‘देऊळ बंद २’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करत आहे. हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलींना मदतीचा हात देणार आहे. ‘माणुसकीची चळवळ’ या संस्थेने या मोहिमेअंतर्गत ३०० शेतकरी कन्यांना दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. या चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्याचा संपूर्ण वापर या मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी केला जाईल. दत्तक घेतलेल्या प्रत्येक मुलीला तिच्या उच्च शिक्षणासाठी थेट १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ‘माणुसकीची चळवळ’ संस्थेचे प्रमुख राज देशमुख यांनी ही घोषणा केली. ‘देऊळ बंद २’ या चित्रपटात शेतकऱ्यांच्या संवेदनशील आणि ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे. कर्जबाजारीपणा, दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, बोगस बियाणे, वाढती महागाई आणि सिंचन सुविधांचा अभाव यांमुळे शेतकरी मोठ्या मानसिक तणावात आहेत. शासकीय योजनांची अपूर्ण अंमलबजावणी आणि प्रशासकीय भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरही चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. या उपक्रमाबाबत बोलताना राज देशमुख म्हणाले, “शेतकऱ्यांचे दुःख केवळ पडद्यावर दाखवून आम्हाला थांबायचे नाही, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे. बळीराजाच्या मुलींच्या पंखांना बळ देणे आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करणे हे आमचे परम कर्तव्य आहे.” चित्रपटाच्या माध्यमातून सुरू झालेली ही ‘माणुसकीची चळवळ’ संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. संवेदनशील नागरिकांनी या चळवळीला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed