संजय शिरसाटांना आवरा, नाहीतर थेट शिंदेंकडे तक्रार:राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा; तटकरेंच्या वक्तव्यावरही दिले स्पष्टीकरण
![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षातील मतभेदांवर मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षात सध्या काही नाराजी आणि मतभेद दिसत असले तरी येत्या आठवड्यात सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून हे प्रश्न सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंध असून पक्षाचे 42 चे 42 आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे पक्ष फुटीच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना हसन मुश्रीफ यांनी थेट इशाराच दिला. शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते असल्याने त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच आपण उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती, असेही त्यांनी सांगितले. आता समन्वय समितीच्या बैठकीत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले. सुनील तटकरे यांच्या मी मागच्या दाराने आलो नाही, या वक्तव्यावरूनही राज्यात चर्चा रंगली होती. यावर बोलताना मुश्रीफ यांनी तटकरे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये, असे म्हटले. हे वक्तव्य कोणालाही उद्देशून करण्यात आलेले नसून त्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाच्या चर्चांना फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं संकेत त्यांनी दिले. राहुल गांधींनी पंतप्रधानांबद्दल वापरलेली भाषा योग्य नाही यावेळी हसन मुश्रीफ यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातही भाष्य केले. शरद पवार यांनी मोदी यांच्या परराष्ट्र दौऱ्यांबाबत आणि जागतिक पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल केलेलं कौतुक स्वागतार्ह असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना वापरलेली भाषा योग्य नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलताना सभ्य शब्दांचा वापर व्हायला हवा, असे सांगत त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार कर्जमाफीच्या मुद्द्यावरही हसन मुश्रीफ यांनी मोठी माहिती दिली. मुख्यमंत्रीांनी 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी लागू करण्याची घोषणा केली असून त्यानुसार प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 1 जून 2025 पूर्वीची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन वर्षांपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
