यवतमाळ हादरले:फायनान्सच्या वादातून तरुणाचा खून, मुख्य आरोपीसह 4 जण पोलिसांच्या ताब्यात, विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरातील घटना
![]()
यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात गुरुवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. वाहन फायनान्सच्या पैशांच्या देवाणघेवाणीतून हा रक्तरंजित थरार घडल्याचे समोर आले आहे. सचिन उर्फ येडा राठोड रा. जामनकर नगर, यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. यात आधी वाद झाला होता. त्यानंतर समेटही घडून आली होती. मात्र, पुन्हा वाद उफळून हत्या करण्यात आली. अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने तत्परता दाखवत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मृत सचिन राठोड हा शहरातील ‘पाटील एंटरप्राइजेस’ या कंपनीत गाड्यासीझ (जप्त) करण्याचे काम करायचा. हा जीवघेणा हल्ला पाहून सचिनचे मित्र जिशान पाजी आणि पोईन काझी हे त्याला वाचवण्यासाठी धावले. मात्र,संतप्त आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला चढवला, ज्यामध्ये त्यांच्या हात आणि छातीवर जखमा झाल्या. या दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या सचिनने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, रक्ताने माखलेला आरोपी बकुल एवढ्यावरच थांबला नाही, त्याने आपली गाडी काढली आणि सिनेस्टाईल पाठलाग करून सचिनला गाठून जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी झालेला सचिन हनुमान मंदिराजवळ बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मित्रांना दिसून आला. मित्रांनी अत्यंत गंभीरअवस्थेत त्याला एका चार चाकी वाहनातून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांचे पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. मृत सचिनचे नातेवाईक भोला राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अवधूतवाडी डिबी पथकाने तातडीने चक्र फिरवली आणि मुख्य आरोपी बकुल उर्फ शेख शाहीद शेख रफीक याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून ४ संशयितांनाही ताब्यात घेतले आहे. ‘त्या’ सचिन राठोडची जीवनयात्रा संपली भूतकाळातील गुन्हेगारीचे गडद सावट पाठीमागून सारत, मुख्य प्रवाहात येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला आणि पोलिसांच्या एमपीडीए सारख्या कडक कारवाईला सामोरा गेलेला यवतमाळातील कुख्यात तरुण सचिन उर्फ येडा राठोड याची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून सचिनने गुन्हेगारी विश्वापासून पूर्णपणे अलिप्त राहून सुधारण्याचा मार्ग निवडला होता. या कालावधीत त्याच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद पोलिसात नव्हती.गुन्हेगारीला रामराम ठोकून सन्मानाने जगण्यासाठी काही दिवसांपूर्वीच त्याने यवतमाळ शहरात येत एका फायनान्स कंपनीत कायदेशीर नोकरी पत्करली होती. तडजोडीनंतरही धग फायनान्सच्या पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. दरम्यान झालेल्या याच वादातून ‘येडा उर्फसचिन राठोड’ नावाच्या तरुणाचा गुरुवारी निर्घृण खून करण्यात आला. बुधवारी रात्री दोन्ही बाजूंमध्ये तडजोड झाली असतानाही, आरोपीने मनात राग ठेवून दुसऱ्याच दिवशी हा गेम केल्याची प्राथमिक चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे. जवळ बोलावून सपासप वार गुरुवारी सकाळी सचिन हा त्याच्या मित्रांसह विदर्भ हाउसिंग सोसायटीतील हनुमान मंदिराजवळ उभा होता. त्याच वेळी मुख्य आरोपी बकुल उर्फ शेख शाहीद तिथे पोहोचला. सुरुवातीला तो मित्राशी बोलून निघून गेला, मात्र काही वेळातच तो पुन्हा परतला.त्याने सचिनला जवळ बोलावले. सचिन जवळ येताच बकुलने काही समजण्याच्या आत तीक्ष्ण चाकू काढून त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
