राज्यात 20% विक्री वाढल्याने पेट्रोल-डिझेलचा कृत्रिम तुटवडा:भुजबळांनी केला खुलासा; इंधन संकटाच्या चर्चा, पण सरकार म्हणतंय पुरेसा साठा
![]()
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करण्यास सुरुवात केल्याने काही पेट्रोल पंपांवर गर्दीही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही घाबराट बाळगू नये, अशी स्पष्ट माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई निर्माण झालेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त पेट्रोल-डिझेल खरेदी करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक भागांमध्ये अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम म्हणून मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत 20% अधिक इंधन विक्री झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याची चिंता प्रशासनाने व्यक्त केली आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांना आवश्यक तेवढे इंधन पुरवण्यास पूर्णपणे सक्षम आहे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी साठेबाजी टाळावी आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. विविध जिल्ह्यांमधील इंधन विक्रीची आकडेवारीही त्यांनी माध्यमांसमोर मांडली. राज्यात सध्या पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील इंधन परिस्थितीवर भाष्य करत राज्य प्रशासन सतर्क असल्याचे सांगितले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून शेतीसाठी लागणाऱ्या डिझेल पुरवठ्याबाबत विशेष नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध व्हावे यासाठी स्वतंत्र आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. कुणीही पेट्रोल आणि डिझेलची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन करत आवश्यकतेनुसार इंधन पुरवठ्याचे नियोजन केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. घाबरण्याचे कारण नाही – मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात सर्वत्र तणावाची परिस्थिती नसल्याचे स्पष्ट केले. एखादी घटना घडली की ती अधिक चर्चेत येते, मात्र त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था सध्या 660 बिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर असून आगामी काळात सिंगापूर आणि दुबईसारख्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकण्याची क्षमता देशात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
